आधुनिक तंत्रज्ञान वापरणारा शेतकरी ‘राजा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:51+5:302021-07-01T04:15:51+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील प्रगतशील शेतकरी घेगडे बंधूंनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत लाखो रुपयांचे वार्षिक उत्पन्न घेऊन ...
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील प्रगतशील शेतकरी घेगडे बंधूंनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत लाखो रुपयांचे वार्षिक उत्पन्न घेऊन शेतकरी ‘राजा’ असल्याचे दाखवून दिले आहे.
माठ येथील गुलाबराव घेगडे व त्यांची मुले राजेंद्र व संजय हे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतात. घेगडे बंधूंना एकूण १० एकर क्षेत्र आहे. शेतात ढोर मेहनत न करता पिकांचे योग्य नियोजन, व्यवस्थापन, बाजारभाव, योग्यवेळी विक्री, मार्केटिंग यांची सांगड घालत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून वार्षिक सरासरी १८ लाखांचे उत्पन्न घेतात.
घेगडे बंधू शेतात मिश्र पीक पद्धतीने तिमाही, सहामाही, नऊमाही, बारामाही या चार गटांमध्ये पीक लागवड करतात. तिमाही पीक पद्धतीत वेलवर्गीय पिके घेतात. त्यामध्ये काकडी, दोडका, भेंडी, गवार, भोपळा या पिकांचा समावेश आहे. सहामाही पिकांत वांगी, कांदा ही पिके घेतात. नऊमाही पिकांत डाळींब फळबागेची लागवड केली आहे. बारमाही पीक पद्धतीत त्यांनी उसाची स्वतंत्र चार एकरवर लागवड केली आहे.
हंगामानुसार पालेभाज्या पिके घेऊन ते नफा मिळवतात. वर्षातून दोन वेळा ही पिके घेतली जातात. त्यासाठी ते जमिनीचा बदल करतात. क्षेत्र बदलून घेतल्याने माल चांगल्या प्रतीचा येतो आणि उत्पादनातही वाढ बघायला मिळते, असे ते सांगतात.
घेगडे बंधू परिसरातील शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन बीज प्रक्रिया, कीड व्यवस्थापन, पिकांची निवड, आधुनिक शेती, सेंद्रिय खत मिश्र पिके याविषयी मार्गदर्शन करतात.
हवामान बदलल्याने अनेक वेळा पिकाला फटका बसतो. त्यासाठी २० गुंठे क्षेत्रावर त्यांनी शेडनेट उभारले आहे. त्यात ते सिमला मिरचीचे उत्पादन घेतात. घेगडे यांनी शेतात सुंदर उद्यान उभारले आहे. तसेच पर्णकुटी तयार केली आहे. शेतात काम करून थकल्यावर तेथे ते विश्रांतीसाठी येतात. तेथे त्यांनी सर्व प्रकारच्या फळझाडांची लागवड केली आहे. शेतीचे ‘प्रताप ॲग्रो फार्म’ या नावाने ब्रँडिंग केले असून, शेतीचा सर्व कारभार पाहण्यासाठी ऑफिस ‘शेतकरी कार्यालय’ या नावाने सुरू केले आहे. येथे कृषी अधिकारी, शेतकरी, कृषी क्षेत्रातील विद्यार्थी भेट देण्यासाठी येतात. त्यांनी केलेला शेतीतील अनोखा प्रयोग समजावून घेतात.
घेगडे बंधूंना तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, मंडल कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, कृषी सहाय्यक अनिल पाचपुते, प्रतीक कांबळे, अशोक नेर्लेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.
----
गांडूळ खताचे स्वतंत्र युनिट..
शेतीसाठी ते रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खताचा वापर करतात. त्यासाठी त्यांनी गांडूळ खताचे स्वतंत्र युनिट उभे केले आहे. शेतीसाठी आवश्यक तितके पाणी मिळावे, यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करतात. पिकाला स्लरी, खत देण्यासाठी त्यांनी मोठमोठे ड्रम उभे केले आहेत.
---
शेतातच उभारले हवामान यंत्र
कोणत्या पिकावर कधी फवारणी करायची, किती पाणी द्यायचे, आज खत औषधी देणे योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी हवामान यंत्रदेखील शेतात बसविले आहे. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज त्यांना येतो. त्यानुसार ते कधी, कोणते औषध आणि खत, पाणी देणे योग्य असेल, याचे व्यवस्थापन करतात.
-----
३० देवदैठण शेती