शेतकऱ्याने बनविले बोअरवेलमधील विद्युत पंप काढण्याचे यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:31 AM2021-02-23T04:31:29+5:302021-02-23T04:31:29+5:30
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील एका शेतकऱ्याने बोअरवेलमधील विद्युत पंप काढण्यासाठी लागणारे यंत्र घरीच बनवले आहे. या यंत्रामुळे ...
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील एका शेतकऱ्याने बोअरवेलमधील विद्युत पंप काढण्यासाठी लागणारे यंत्र घरीच बनवले आहे. या यंत्रामुळे कमी खर्चात शेतकऱ्यांच्या वेळ व कष्टाची बचत होत आहे.
भावीनिमगाव येथील प्रगतशील शेतकरी आत्माराम सखाराम तोरमड यांना वडिलोपार्जित तीन एकर जमीन आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब शेती व्यवसायात व्यस्त असते. पहिल्यापासूनच शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची तोरमड यांना आवड आहे. त्यांनी शेतीत केलेल्या प्रयोगांचे परिसरातील शेतकरी अनुकरण करतात. नुकतेच त्यांनी घरीच बोअरवेलमधील विद्युत पंप काढण्यासाठीचे यंत्र आधुनिक पद्धतीने बनविले आहे. या यंत्राच्या सहाय्याने बोअरवेलमधील विद्युत पंप कमी कष्टात सुलभरित्या वर काढता येते किंवा बोअरवेलमध्ये सोडताही येतो. पारंपरिक यंत्राने १५० फूट खोलीवर असलेला विद्युत पंप काढण्यासाठी २ मजुरांना २ तास लागत होते. मात्र या आधुनिक यंत्राने हेच काम फक्त ३० मिनिटात एकच मजूर पूर्ण करत आहे.
तोरमड यांनी या यंत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. त्याला शेतकऱ्यांमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला व यंत्राची मागणी वाढली. मागणी लक्षात घेता तोरमड यांनी आणखी यंत्र बनवण्याचे काम घरीच सुरू केले आहे.
----
यंत्र बनवून दोन पैसे मिळवणे हा उद्देश नव्हता. मात्र बोअरवेलमधील मोटार काढण्याचे कष्टाचे व वेळखाऊ काम सोपे व्हावे यासाठी बऱ्याचदा प्रयोग केले. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर यश मिळाले याचा आनंद आहे. शेतकऱ्यांनी या यंत्राला पसंती दिल्याने अधिक यंत्र बनविण्याचे काम हाती घेतले आहे.
-आत्माराम तोरमड,
प्रयोगशील शेतकरी, भावीनिमगाव
---
२२ आत्माराम तोरमड
भावीनिमगाव येथील प्रयोगशील शेतकरी आत्माराम तोरमड यांनी बोअरवेलमधील विद्युत पंप काढण्यासाठी लागणारे यंत्र आधुनिक पद्धतीने बनविले आहे.