शेतक-याचे प्रसंगावधान; रेल्वे अपघात टळला, हजारो प्रवाशांचे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 03:38 PM2019-11-10T15:38:55+5:302019-11-10T15:54:04+5:30
हुतात्मा एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास नगर तालुक्यातील देहरे शिवारात आला. वेगात चाललेल्या रेल्वेतील प्रवाशांचे प्राण एका शेतक-याच्या सतर्कतेमुळे वाचले.
योगेश गुंड /
केडगाव : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय हुतात्मा एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास नगर तालुक्यातील देहरे शिवारात आला. वेगात चाललेल्या रेल्वेतील प्रवाशांचे प्राण एका शेतक-याच्या सतर्कतेमुळे वाचले. रेल्वेचा मार्ग तुटल्याचे त्याने पाहताच प्रसंगावधान राखत रेल्वे थांबवण्यास भाग पाडले. तुटलेला रेल्वे मार्ग पाहून रेल्वेतील कर्मचाºयांना धक्काच बसला. शेतक-यामुळे मोठी दुघर्टना टळली.
रामदास बापूराव थोरात (वय ४५, रा. विळद, ता. नगर) असे त्या शेतक-याचे नाव आहे. मनमाडहून नगरच्या दिशेने जाणारी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस आज सकाळच्या वेळी राहुरी तालुक्यातील वांबोरीहून नगरच्या दिशेने जात होती. ही गाडी नगर तालुक्यातील देहरे, विळद परिसरात आली होती. त्यावेळी येथून रेल्वे लाईनक्रॉस करून आपल्या शेतात पाणी देण्यासाठी शेतकरी रामदास बापूराव थोरात हे जात असताना विळद-वांबोरीच्या दरम्यान रेल्वेचा मार्ग (रूळ) तुटल्याचे शेतक-याच्या निदर्शनास आले. त्याच वेळी समोरच्या दिशेने भरधाव वेगाने गाडी येत असल्याचे त्यांनी पाहिले. आता पुढे काय होणार याची कल्पना या शेतक-याला क्षणात आली. त्याच वेळी क्षणाचा विलंब न करता थोरात यांनी लगेच हालचाल सुरू केली. आपल्या जिवाची परवा न करता त्यांनी अंगातील लाल रंगाचे बनियन काढून हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे रूळातून गाडीच्या दिशेने हातात लाल बनियन फडकवत धाव घेतली. वाढते वय व शरीर यांची तमा न बाळगता ते वेगाने धावत सुटले. काळजाचा ठोका चुकावा असा तो क्षण होता. पळून त्यांना खूप दम लागला होता तरीही ते न थांबता रेल्वे रूळातून पळत राहिले. लाल कापड फडकवत असलेला व गाडीच्या दिशेने तो व्यक्ती पळत येत असल्याचे रेल्वे चालकाने पाहिले. या व्यक्तीला काहीतरी धोक्याची सूचना द्यायची असल्याचे लक्षात येताच चालकाने त्वरीत ब्रेक लाऊन गाडी थांबवली. शेतक-याने रेल्वेचा रूळ पुढे तुटल्याचे सांगितले. चालकाने व इतर रेल्वे कर्मचा-यांनी खातजमा केली. झालेली घटना त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना कळविली. रेल्वे कर्मचाºयांनी काही वेळात येऊन तात्पुरता रेल्वे रूळ दुरूस्त करून गाडी पुढे जाऊ देण्यात आली