कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 08:58 PM2020-02-11T20:58:44+5:302020-02-11T21:00:10+5:30
सततच्या नापिकीमुळे आणि खाजगी संस्थांच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील शेतकरी अशोक एकनाथ मगर (वय ४५) यांनी मंगळवारी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोणी (जि. अहमदनगर) : सततच्या नापिकीमुळे आणि खाजगी संस्थांच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील शेतकरी अशोक एकनाथ मगर (वय ४५) यांनी मंगळवारी (दि.११) सकाळी आपल्या राहात्या घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
मगर यांच्या नावे गोगलगाव येथे तीन एकर कोरडवाहू शेतजमीन असल्याने ते इतरत्र मोलमजुरी करून पत्नी आणि दोन मुलांचा उदरनिर्वाह करीत होते. स्वत:च्या शेतजमिनीसाठी पाणी नसल्यामुळे गोगलगाव येथील आपल्या राहात्या घराजवळच लक्ष्मण उगले यांची शेतजमीन (गट नं. ७६) अशोक यांनी वाट्याने कसण्यासाठी घेतली होती. याही शेतजमिनीत पेरलेला गहू पाण्याअभावी करपून गेला होता. या पिकांसाठी केलेला खर्च वसूल होईल की नाही या धास्तीने ते चिंताग्रस्त होते. त्यातच वर्षापूर्वी श्रीराम फायन्सास या खाजगी कंपनीकडून त्यांनी गायीसाठी कर्ज घेतले होते. याचाही त्यांच्याकडे तगादा सुरू होता. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली.
मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहात्या घराजवळ लक्ष्मण उगले यांच्या शेतजमिनीतील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. लोणी (ता.राहाता) येथून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोगलगावातल ही दीड वर्षातील चौथी शेतकरी आत्महत्या आहे.