...म्हणून शेतात बुजगावणं वापरू नका; चिमण्या-पाखरांवर 'ममता' करणाऱ्या शेतकरी महिलेची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 04:50 AM2020-03-07T04:50:22+5:302020-03-07T13:28:41+5:30

पाखरांना दाणापाणी द्या. त्यातून शेतातील कीड नष्ट होऊन उत्पादन वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत.

Farmer woman's affection for sparrows | ...म्हणून शेतात बुजगावणं वापरू नका; चिमण्या-पाखरांवर 'ममता' करणाऱ्या शेतकरी महिलेची साद

...म्हणून शेतात बुजगावणं वापरू नका; चिमण्या-पाखरांवर 'ममता' करणाऱ्या शेतकरी महिलेची साद

सुदाम देशमुख 
अहमदनगर : पाखरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बुजगावणे वापरतात. मात्र अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील ममताबाई भांगरे या बुजगावण्याशिवाय शेती करा असा धडा जगाला देत आहेत. पाखरांना दाणापाणी द्या. त्यातून शेतातील कीड नष्ट होऊन उत्पादन वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत.
देवगाव (ता. अकोले) येथील ममताबाई या हजारांच्यावर चिमण्या-पाखरांच्या अन्नदाता बनल्या आहेत. त्या म्हणतात, शेतकऱ्यांनी पाखरांना दाणापाणी भरविण्याची खबरदारी घ्यायला हवी. मात्र, शेतकरीच आज पाखरांना दूर लोटू पाहत आहेत. जे अयोग्य आहे.
माझ्या अंगणात असलेल्या बोगणवेलावर दररोज शेकडो चिमण्या बागडतात. दिवसातून तीन वेळा
मी त्यांना तांदूळ टाकते. त्यामुळे
मी अंगणात गेले तरी चिमण्या चिवचिवाट करुन माझ्यावरील प्रेम व्यक्त करतात. वर्षात तांदळाचे एक पोते मी या चिमण्यांनाच खाऊ घालते.
आपल्या शेतातही पाखरांना मुक्त प्रवेश आहे. पाखरे हाकलण्यासाठी मी शेतात कधीही बुजगावणे उभे करत नाही. त्यामुळे पाखरे मनसोक्तपणे पिकांशी खेळतात. याचा फायदा असा होतो की पिकांवर असलेले किटकही पाखरे खाऊन टाकतात.
तेच खरे पिकांचे राखण करतात. त्यामुळे माझ्या शेतात पिकांवर रोग येण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. रासायनिक फवारण्या करण्याची
गरज पडत नाही.
पाखरांनी काही अन्न खाल्ले तरी आपणाला चांगले उत्पादन मिळते. पाखरांचा किलबिलाट हे एकप्रकारचे संगीतच असते. त्याचाही पिकांना फायदा मिळतो, असेही त्यांचे म्हणणे आहे.
>आश्रमशाळांतील मुलांना सेंद्रिय भाजीपाला
ममताबाई १0 वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत. ‘बायफ’ या संस्थेकडून त्यांनी यासाठी मार्गदर्शन घेतले. गांडूळ खताच्या छोट्या गोळ्या त्या तयार करतात. चिखलात भाताच्या रोपांमध्ये या गोळ्या पेरतात. त्यामुळे पिकांना चांगले खत मिळून उत्पादन वाढते, असा त्यांचा निष्कर्ष आहे. अकोले तालुक्यातील शेणित, मुतखेल, मान्हेरे या आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांना त्यांनी सेंद्रिय शेतीचे धडे दिले. त्यामुळे या शाळा आपला भाजीपाला या खतांवरच तयार करतात. सर्वच आश्रमशाळांनी याची अंमलबजावणी केली तर मुलांना सकस अन्न मिळेल, असे ममताबार्इंचे म्हणणे आहे.

Web Title: Farmer woman's affection for sparrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.