जीवनसाथी वेबसाईटच्या माध्यमातून शेतकरी तरुणाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:31 PM2019-12-15T12:31:37+5:302019-12-15T12:31:59+5:30
जीवनसाथी वेबसाईटच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून जामखेड तालुक्यातील सारोळा येथील शेतकरी तरुणाला तब्बल १ लाख ६५ हजार रुपयांना गंडा घातला.
अहमदनगर : जीवनसाथी वेबसाईटच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून जामखेड तालुक्यातील सारोळा येथील शेतकरी तरुणाला तब्बल १ लाख ६५ हजार रुपयांना गंडा घातला. याबाबत सदर तरुणाने शुक्रवार(दि़ १३) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़.
सारोळा येथील ३३ वर्षीय तरुणाने स्वत:च्या लग्नासाठी ६ सप्टेंबर २०१८ रोजी जीवनसाथी या वेबसाईटवर नावनोंदणी केली होती. या साईटवर तो लग्नाळू तरुणींचे प्रोफाईल तपासत असताना त्याला अश्विनी (नाव बदलेले आहे) हिची पोफाईल दिसली. तरुणाने तिच्याशी संपर्क केला तेव्हा तिने याचा बायोटाडा मागावून घेतला. त्यानंतर दोघे व्हॉटसअॅपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधू लागले. अश्विनी हिने ती मुंबई येथे राहत असून जाहिराती व शॉटफिल्म तयार करण्याचा व्यवसाय करते अशी ओळख सांगितली होती. ११ डिसेंबर २०१२ रोजी आश्विनी हिने तरुणाला मेसेज केला की, ‘मी दुबई येथे असून माझ्याकडील सर्व पैसे संपले आहेत. मला आता खर्चासाठी २ हजार रुपये पाठव’ या मेसेजनंतर तरुणाने तिच्या बँक खात्यावर पैसे पाठविले. त्यानंतर विविध कारण, अडचणी सांगून आश्विनी हिने या तरुणाकडून तब्बल १ लाख ६५ हजार रुपये घेतले. तरुणाने तिला भेटण्याची वारंवार विनंती केली. मात्र वेगवेगळे कारणे सांगून तिने भेटण्याचे टाळले़ त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या तरुणाच्या लक्षात आले. सदर तरुणीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतिक कोळी, योगेश गोसावी, राहुल गुंडू, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, हुसळे आदी टीम तपास करत आहे.
तिचा तो पत्ता खोटाच़़
आश्विनी हिने या तरुणाला तिचा वाशी येथील पत्ता सांगितला होता. विनंती करूनही ती भेटत नसल्याने तरुण थेट वाशी येथे जाऊन आला. तेथे गेल्यानंतर मात्र तिने दिलेला पत्ताच खोटा असल्याचे समोर आले़.
‘ती’ एकदाही फोनवर बोलली नाही
सारोळ्याचा तरुण एक वर्षे तिच्यासोबत केवळ व्हॉटसअॅप चॉटिंगच्या माध्यमातून संवाद साधत होता़. आश्विनी एकदाही त्याच्यासोबत फोनवर अथवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलली नाही. लग्नासाठी आतूर झालेल्या तरुणाने मात्र ती मागेल तेव्हा तिच्या बँक खात्यावर पैसे टाकत राहिला़.