नेवासा तहसील कार्यालयावर भाकड गायींसह शेतक-यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:21 PM2018-06-01T18:21:26+5:302018-06-01T18:21:38+5:30
भाकड गायांचे अनुदान गोशाळेला न देता शेतक-यांच्या खात्यावर जमा करावे यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चात सहभागी असलेल्या भाकड गायीला तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वाराला बांधून निषेध करण्यात आला.
नेवासा : भाकड गायांचे अनुदान गोशाळेला न देता शेतक-यांच्या खात्यावर जमा करावे यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चात सहभागी असलेल्या भाकड गायीला तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वाराला बांधून निषेध करण्यात आला.
भाकड गायींचे अनुदान गोशाळेला न देता शेतक-यांच्या खात्यावर जमा करावीत. गायीच्या दुधाला २७ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३५ रुपये भाव मिळावा. पशुखाद्याचे दर कमी करावे. गायी व म्हशींना शासकीय अनुदान मिळावे या मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शहरातील खोलेश्वर मंदिर येथून जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसिल कार्यलयावर मोर्चा आल्यानंतर तरुण शेतक-यांनी सरकार विरोधी संतप्त भावना व्यक्त केल्या. जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे म्हणाले, रासायनिक खतांला शासकीय अनुदान देता तर शेतकरी शेणखत टाकतो त्यालाही अनुदान दिले तर शेतकरी शेणखत टाकू शकतो. मग खासगी खतावाल्याना अनुदान कशासाठी देता असा सवाल त्यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास मुंबई येथे दि ५ जून रोजी मंत्रालयात जाऊन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या कॅबिनमधून खुर्ची बाहेर काढणार असल्याचा इशारा प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी दिला.
यावेळी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर व पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अजित धस,तालुकाध्यक्ष श्याम ढोकणे,अपंग प्रहार संघटनेचे संदीप डौले, एन.आर.भारस्कर, नितीन पुंड, विनोद परदेशी, गणेश कोकणे, नितीन शेळके, गोवर्धन म्हस्के, नारायण गरूड, पुंजाराम पेचे उपस्थित होते.