अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना मि‌ळाली नवी दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:21 AM2021-05-20T04:21:14+5:302021-05-20T04:21:14+5:30

अकोले : तालुक्यात निसर्गाची मुक्त उधळण असतानाही मर्यादित उपजीविकेची साधने, कमी असलेली उपजावू जमीन यामुळे आदिवासी शेतकरी आर्थिक अडचणी ...

Farmers in Akole taluka get new direction | अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना मि‌ळाली नवी दिशा

अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना मि‌ळाली नवी दिशा

अकोले : तालुक्यात निसर्गाची मुक्त उधळण असतानाही मर्यादित उपजीविकेची साधने, कमी असलेली उपजावू जमीन यामुळे आदिवासी शेतकरी आर्थिक अडचणी येत असे. परंतु गेल्या वर्षभरापासून तालुका कृषी विभागाने ‘आत्मा’च्या सहभागातून आदिवासी शेतकरी यांच्या साथीने मसाले पीक, फणस-चारोळी लागवड, उन्हाळी नाचणी असे प्रयोग राबवून विकासाची नवी दिशा दाखवली आहे.

काळे सोने मिरी मसाले पीक २६ आदिवासी शेतकरी यांच्या सहभागातून धामणवन परिसरात ३ गावांत १ हजार ४३९ रोपे लावण्यात आली आहेत. १० ते १५ फुटांचे वेल झाले असून, पुढील वर्षी त्यास फळे लगडण्याची शक्यता आहे.

आदिवासी बांधवांना फणस गरे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. फणसाची उपलब्धता वाढावी म्हणून ८ गावांतील ३१ शेतकऱ्यांच्या सहकार्याने २७० कलमी फणसाची लागवड करण्यात आली आहे. आता ती झाडे ३ ते ४ फूट उंचीची झाली आहेत. १ फणस १००० रुपये उत्पन्न देऊ शकते. चारोळीसारखे जंगली पीक येथील जंगलात रुजविण्याचा प्रयत्न सुरू असून, यासाठी नंदुरबार तालुक्यातून अक्राणी येथून ११० रोपे गतवर्षी आणून ४ गावांतील १६ शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली आहे. हीच चारोळी मोठी होऊन हिरड्याच्या बरोबरीने उत्पन्न देणार आहे.

त्याचबरोबर आसामी जांभळ्या भाताची ४ गावांत ६ एकर क्षेत्रावर लागवड करून या वर्षासाठी २८०० किलो बियाणे तयार झाले आहे. उन्हाळी नाचणीचा नावीन्यपूर्ण प्रयोग खडकी या गावातील २६ युवक शेतकरी यांनी ९ एकर क्षेत्रावर गटाच्या सहभागातून राबविला आहे. रायवळ आंब्यापासून आमचूर तयार करण्याचे मोठे अभियान सुरू करण्यात आले. ५ गावांत तसे कार्यक्रम घेण्यात आले. नंदुरबार येथील दिवाळकी तुरीचे १० किलो बियाणे १९ गावांत देण्यात आले. या वर्षासाठी १२० किलो बियाणे तयार झाले आहे.

धामणवन येथील शांताराम बारामते यांनी उन्हाळी भात, ठिबकवर उन्हाळी नाचणी, शेततळ्यात मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन असे प्रयोग केले. या उन्हाळ्यात कलिंगड व मिरची यांची थेट बाजारात नेऊन विक्री केल्याने चांगला आर्थिक फायदा झाला आहे. हनुमान पुरुष आदिवासी गट विविध प्रयोगासाठी पुढे सरसावला असून, १५ शेतकऱ्यांनी या वर्षी आसामी जांभळा भात १०० एकर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन केले आहे. मिरी पिकामध्ये लवकर उत्पादन येण्यासाठी शेडनेटमध्ये बुश टाईप मिरीची प्रात्यक्षिक लागवड केली जाणार आहे. फुलशेतीमध्ये झेंडू व शेवंतीबरोबर निशिगंध लागवड करून प्रक्रिया केंद्राशी जोडले जाणार आहे.

......

शेतकऱ्यांचा कोकणातील पीक अभ्यास दौरा फायदेशीर ठरला. तालुक्यात कोकणासारखे वातावरण असल्याने आदिवासी शेतकरी मसाले पीक मिरी व फणस-चारोळी लागवड करू लागला आहे. उन्हाळा नाचणी, जांभळा भात व बांधावरील फळबाग शेती आदिवासींच्या आर्थिक उन्नतीचे साधन बनले आहे.

- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी

..........

Web Title: Farmers in Akole taluka get new direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.