वीज रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी शेतकरीच करतात आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:25+5:302021-09-16T04:27:25+5:30
श्रीरामपूर : महावितरण कंपनीची नादुरुस्त अथवा बिघाड झालेली वीज रोहित्रे दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनाच आटापिटा करावा लागत आहे. महावितरणकडून वेळेत सेवा ...
श्रीरामपूर : महावितरण कंपनीची नादुरुस्त अथवा बिघाड झालेली वीज रोहित्रे दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनाच आटापिटा करावा लागत आहे. महावितरणकडून वेळेत सेवा मिळत नसल्याने शेतकरी लोकवर्गणी करून खासगी वर्कशॉपमधून रोहित्रे दुरुस्त करून घेतात. त्यासाठी १८ ते २५ हजार रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. याशिवाय वीजबिलांचा खर्चही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती पाहायला मिळत आहे.
श्रीरामपूर येथील महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत राहुरी व राहाता तालुक्याचा काही भाग येतो. कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये शेती व घरगुती ग्राहकांचे ५ हजारावर वीज रोहित्रे आहेत. त्यातील १०० रोहित्रे दर महिन्याला नादुरुस्त होतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने हे प्रमाण कमी आहे. मात्र रब्बी हंगामामध्ये वीज पंपांचा वापर वाढताच रोहित्रांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढते.
श्रीरामपूर येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर माहिती घेतली असता महावितरणचा हा सावळा गोंधळ समोर आला. महिन्याला शंभरावर नादुरुस्त झालेली रोहित्रे येथे येत आहेत. मात्र पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी रोहित्रे दुरुस्त करून कार्यान्वित करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागत आहे. नाशिक येथील विभागीय कार्यालयाकडून रोहित्रांसाठी आवश्यक असणारे ऑईल वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आणखी अडचणी उद्भवतात, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करून देण्यासाठी राखीव रोहित्रे उपलब्ध नाहीत. मात्र घरगुती ग्राहकांना वेळेवर सेवा देण्याचा प्रयत्न असतो, असे सांगण्यात आले.
-------------
१८ ते २५ हजार खर्च
खासगी वर्कशॉपमध्ये वीज रोहित्रे दुरुस्तीचा खर्च १८ ते २५ हजार रुपये येतो. नादुरुस्त रोहित्रे खाली उतरविण्यापूर्वी वीज उपकेंद्रावरून वीजपुरवठा बंद करावा लागतो. त्याकरिता काही झिरो वायरमन गावोगावी कार्यरत झाले आहेत. त्यांनाही पैसे देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते.
-----------
वीज कायदा २००३ मधील तरतूद
शहरी भागामध्ये २४ तासात तर ग्रामीण भागामध्ये ७२ तासांमध्ये वीज रोहित्रे दुरुस्त करून मिळावी, असे वीज नियामक आयोगाने सांगितले आहे. तशी सेवा मिळाली नाही तर ग्राहकांना प्रती तास ५० रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी कायद्यात तरतूद आहे.
----------
वीज बिलांची महसुली वसुली आणि तांत्रिक बिघाड या दोन स्वतंत्र बाबी आहेत. थकीत वीजबिलांमुळे ग्राहकांना सेवा नाकारता येत नाही. वीज रोहित्रांच्या तांत्रिक बिघाडाच्या आड बिलांची वसुली करून घेणे गैर आहे.
-अनिल औताडे, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना.
-------
वीज रोहित्र नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना कोणताही खर्च करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी संबंधित शाखा अभियंत्याला माहिती द्यावी. त्यानंतर महावितरणने नेमलेल्या खासगी एजन्सीमार्फत रोहित्राची दुरुस्ती केली जाते. मात्र त्या रोहित्रावरील बिले थकबाकीत नसावीत.
सुनील काकडे, अधीक्षक अभियंता, अहमदनगर