भेंडा परिसरातील शेतकरी कांदा काढणीत व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:20 AM2021-04-25T04:20:17+5:302021-04-25T04:20:17+5:30
भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंडा, कुकाणा परिसरात कांदा काढणीच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. कोरोना महामारीमुळे कांदा काढणीला मजूर मिळणे ...
भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंडा, कुकाणा परिसरात कांदा काढणीच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत.
कोरोना महामारीमुळे कांदा काढणीला मजूर मिळणे अवघड झाले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:चे मनुष्यबळ आहे त्यांचे कांदा काढणीचे काम वेगाने सुरू आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात लागवड केलेला कांदा काढणीस आला आहे. कांदा काढणीच्या कामासाठी रोजंदारीवर हवे तितके मजूर मिळतच नाहीत. महिलांना २०० रुपये रोजंदारी द्यावी लागते. मजूर रोजंदारीऐवजी एक रकमी ठरवून (उक्ते) काम घेण्याला प्राधान्य देत आहेत. एकरी ७ ते ८ हजार रुपयांप्रमाणे कांदा काढणीचा दर आहे. यामध्ये कांदा काढून पात कापणे, कांदा शेतात एका ठिकाणी गोळा करून ठेवणे किंवा ट्रॅक्टर ट्राॅलीत भरण्याचे काम मजूर करतात. एकरी सरासरी ८ ते १० टन कांद्याचे उत्पादन निघत आहे. सध्या अपेक्षित भाव मिळत नसल्याने चाळीत कांदा साठवून ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.