शेतकऱ्यांनी अडविले महामार्ग; रस्त्यावर ओतले दूध, भाजीपाला
By Admin | Published: June 4, 2017 03:46 PM2017-06-04T15:46:04+5:302017-06-04T15:46:04+5:30
शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी नगर जिल्ह्यातून जाणारे महामार्ग रविवारी ठिकठिकाणी अडविण्यात आले़
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ ४ - शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी नगर जिल्ह्यातून जाणारे महामार्ग रविवारी ठिकठिकाणी अडविण्यात आले़ त्यामुळे काही काळ महामार्ग ठप्प झाले होते़ दरम्यान पारनेर तालुक्यातील बेलवंडी फाट्यावर आंदोलक व राज्य राखीव दलाच्या जवानांमध्ये शाब्दिक चकमक झाली़ त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता़
नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव येथील क्रांती चौकात संपकरी शेतकऱ्यांनी सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले़ शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध, भाजीपाला रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला.
संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांना पेशन्स योजना लागू करा, वीजबील माफ करा, शेतीमालाला हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुमारे तासभर राज्यमार्ग रोखला. जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे म्हणाले, राज्यसरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय शेतकरी आंदोलन मागे घेणार नाहीत़ यावेळी उपसरपंच अमृत लिंगडे, उपसभापती प्रशांत बुध्दिवंत, ग्रामपंचायत सदस्य डॉ.पंढरीनाथ गोरे, शेतकरी नेते संजय पवार, राजेंद्र गोरे, डॉ. श्रीराम धस, उध्दव म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मंगळवारी मिरजगाव बंद
मंगळवारी संपाला पाठिंबा म्हणून मिरजगाव शहर बंद ठेवण्यात येणार आहे़ परिसरात अठरा गावातील शेतकरी नगर-सोलापूर राज्यमार्गावर मिरजगाव येथील क्रांती चौकात पुन्हा रास्ता रोको आंदोलन करणार आहेत़
थेरगाव येथे महामार्गावर ओतले दूध
घुमरी येथील शेतकऱ्यांनी थेरगाव येथे नगर-सोलापूर राज्यमार्ग अडवून शेतकरी संप फोडणाऱ्या भाजप सरकारचा निषेध केला़ तसेच रस्त्यावर दूध ओतून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली़ घोगरगाव येथील रविवारचा आठवडे बाजार सुरु होता़ मात्र विक्रेत्यांची संख्या अत्यंत कमी होती़
जवळेत ओतले दूध
पारनेर तालुक्यातील जवळे येथील साईकृपा डेअरीसमोर शेतकऱ्यांनी दूध ओतून भाजप सरकारचा निषेध नोंदविला़ तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत दूध डेअरीला विकणार नाही, असा पवित्रा घेतला़ यावेळी डॉ़ दत्तात्रय खोसे, राजेंद्र लोखंडे, संतोष सालके, अविनाश सालके, विलास बरशिले, सर्जेराव बढे, बाबाजी गाडीलकर, रामदास घावटे आदी उपस्थित होते़
जातेगाव फाट्यावर पुणे महामार्ग अडविला
पारेनरग तालुक्यातील गटेवाडी येथील नवनाथ महाराज गट यांच्या नेतृत्वाखाली जातेगाव फाटा येथे नगर-पुणे महामार्ग अडविण्यात आला़ आंदोलकांनी महामार्गावर दूध ओतून सरकारचा निषेध केला़ यावेळी संतोष ठाणगे, गोरख गट, विलास ठाणगे, राजेंद्र गट, भिवसेन गट, किरण गट, भगवान गट, बंटी गट, अनिल पवार, अनिल गट, सुरज गट, संदीप गट यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला़
आंदोलक-पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक
शेतकरी संपाला पाठींबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण, पाडळी रांजणगाव, नारायणगव्हाण, कुरूंद, कोहोकडी, राळेगण थेरपाळ, मावळेवाडी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बेलवंडी फाट्यावर रविवारी सकाळी सुमारे दीड तास पाडळी रांजणगावचे उपसरपंच विक्रमसिंह कळमकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले़ रस्ता बंद झाल्यानंतर पोलिसांनी राज्य राखीव दलाची तुकडी पाचारण केली. यावेळी दलाने आंदोलनकर्त्यांना घेराव घालून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता़ त्यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक झाली़ यावेळी दिपक खंदारे,जालींदर शेळके आदींसह शेतकरी उपस्थित होते़
लोणीव्यंकनाथमध्ये दहा जणांवर गुन्हे
श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ रास्ता रोको आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना आंदोलकांनी घोषणाबाजी करीत घेराव घातला़ त्यामुळे पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
पाथर्डीत रास्ता रोको
शेतकरी क्रांती संघटनेच्यावतीने पाथर्डी शहरातील नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला़ रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती़ सोमवारी पाथर्डी बंद ठेवण्यात येणार आहे़