पंचनामा सुरू असताना शेतक-याने सोयाबीन पेटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 06:19 PM2019-11-04T18:19:55+5:302019-11-04T18:20:42+5:30
एका शेतक-याने नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिका-यांसमोरच अवकाळी पावसामुळे मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगा-यास आग लावली.
बेलापूर : एका शेतक-याने नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिका-यांसमोरच अवकाळी पावसामुळे मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगा-यास आग लावली. या घटनेमुळे अवकाळीने केलेल्या नुकसानीची प्रचिती येत आहे. बेलापूर खुर्द येथे रविवारी दुपारी हा प्रकार घडला.
आशा रामराव महाडिक व रामराव नारायण महाडिक यांच्या एक एकर शेतात सोयाबीनचे पीक होते. मात्र अवकाळी पावसाने काढणीस आलेले सोयाबीन पूर्णत: भिजून गेले. सोयाबीनला मोड फुटले. सरकारने नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बेलापूर खुर्द येथील ग्रामसेवक सी.डी. तुंबारे, कृषी अधिकारी तनपुरे, तसेच कोतवाल सुनील बाराहते, पोलीस पाटील उमेश बारहाते, युवराज जोशी हे महाडिक यांच्या शेतात पंचनामा करण्याकरीता गेले. सोयाबीनला पूर्णपणे कोंब फुटले असल्याने महाडिक हे हतबल झाले. पंचनाम्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या. पंचनाम्याकरीता पिकाची छायाचित्रे, सातबारा उतारा, विमा पावती आदी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही मदत मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे महाडिक यांनी पंचनाम्याकरीता आलेल्या महसूल कर्मचा-यांसमोरच सोयाबीनच्या ढिगा-याला आग लावली.
कर्मचारी गोंधळले
महसूल कर्मचारीही त्यामुळे काही वेळ गोंधळून गेले. तलाठी विकास शिंदे यांनी संबंधित शेतक-याच्या नुकसानीचा पंचनामा करुन कागदपत्रे जमा केल्याचे सांगितले. पावसाने भिजल्यामुळे सोयाबीनला मोड फुटलेले होते अशी माहिती त्यांनी दिली.