शेतकऱ्यांचे उपोषण
By Admin | Published: August 27, 2014 10:55 PM2014-08-27T22:55:50+5:302014-08-27T23:08:47+5:30
मुळा नदीत मुळा धरणातून जोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.
नेवासा : मुळा नदीवरील मानोरी, पानेगाव-मांजरी, वांळुजपोई- अंमळनेर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात धरणाचे पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी मुळा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी पानेगाव-मांजरी येथील नदीपात्रात मंगळवारपासून सुरु केलेले उपोषण बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरु होते. मुळा नदीत मुळा धरणातून जोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.
मुळा नदीवरील मानोरी, पानेगाव-मांजरी, पांजुळपोई, अंमळनेर हे तीन बंधारे मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांची जीवनरेषा आहे. याच बंधाऱ्यावर या भागातील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. मुळा धरणातून या तीनही बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती. याची दखल संबंधित खात्याने न घेतल्याने आज परिस्थिती भयानक व दुष्काळसदृश झाली आहे, असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. या भागातील विहिरी, कुपनलिका कोरड्या आहेत. तीन वर्षापासून बंधाऱ्यात पाणीसाठा झालेला नाही. सध्या मुळा धरणात २० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याने मुळा नदीवरील तीनही बंधारे भरणे गरजेचे होते. येथील सिंचन प्रश्न या बंधाऱ्यावरच अवलंबून असल्याने जनावरांसह पिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी येईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असे या शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. मुळा धरणातून वर्षातून बंधाऱ्यांना पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.उपोषणाचे नेतृत्व नेवासा तालुक्यातील शिरेगावचे सरपंच किरण जाधव, पानेगावचे उपसरपंच डॉ.जयवंत गुडघे, मुळाथडी पाणी हक्क आरक्षण कृती समितीचे उपाध्यक्ष विलास सैंदोरे, नानासाहेब जुंधारे करीत आहेत. उपोषणकर्त्यांची माजी आ़ भानुदास मुरकुटे, नेवासा तालुक्याचे ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, बाळासाहेब मुरकुटे, साहेबराव घाडगे, उत्तमराव म्हसे, बाळासाहेब पवार यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला.
(तालुका प्रतिनिधी)