शेतक-यांवरील आयकराचे बालंट टाळणारे खताळदादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 12:30 PM2019-08-16T12:30:11+5:302019-08-16T12:32:07+5:30
शेतक-यांवर आयकर लागू करण्याबाबत तत्कालीन केंद्र सरकारचा विचार होता. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यावर चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले होते. या बैठकीत मुख्यमंत्री नसलेले केवळ बी. जे. खताळ उपस्थित होते. विशेष सर्वच मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना आयकर लागू करण्यास जवळपास होकार दिला होता. त्यावेळी सरकार काँगे्रसचे होते आणि बी. जे. खताळ काँगे्रसचेच मंत्री होते. पक्षश्रेष्ठींच्या विरोधात बोलण्यास एकही मुख्यमंत्री तयार नसताना बी. जे. खताळ उठले आणि प्रस्तावाविरोधात जोरदार भूमिका मांडली आणि शेतक-यांवरील आयकराचे बालंट खताळदादांनी टाळले.
अहमदनगर : महाराष्ट्राच्या राजकारणात सात दशकाहून अधिक काळापासून सक्रिय असलेले खताळदादा हे सध्या वयाची शंभरी पार करून १०१ व्या वर्षी महाराष्ट्राच्या सध्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींवर सजगपणे लक्ष ठेऊन आहेत. सन १९४४ पासून समाजकारणात आणि १९५२ पासून निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केलेल्या दादांनी सन १९६२ ते १९८५ या काळात राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. खरे तर महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नवमहाराष्ट्र घडविण्याचे काम ज्या मंडळींनी केले त्यात खताळ दादांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. हे सर्व करीत असताना त्यांची अभ्यासूवृत्ती, तत्वनिष्ठा, सामाजिक जाणिवा व कडक शिस्तीचा तितकाच बोलबाला होता.
२६ मार्च १९१९ रोजी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे दादांचा जन्म झाला. घरात वडिलोपार्जित पाटीलकी होती. काहीशा कष्टातच त्यांचे बालपण गेले. दादांच्या जन्मानंतर वर्षभरातच त्यांची आई गेली. त्यांच्यापेक्षा थोरल्या भावाला तो वर्षाचा व्हायच्या आतच डोळ्यांत खुप-या पडून अंधत्व आले. दादा चार-पाच वर्षांचे असतानाच त्यांच्यापेक्षा ९ वर्षांनी मोठी असलेली बहीण गेली. मात्र इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी धांदरफळ येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे संगमनेरला खासगी वर्गात व पेटिट विद्यालयात त्यांनी आपले विद्यायलीन शिक्षण पूर्ण केले. १९३८ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी बडोदा येथील गायकवाड महाविद्यालयात प्रवेश घेतला. ख-या अर्थाने व्यापक समाज जीवनाची ओळख त्यांना इथेच झाली. खेड्यातून आले असले तरी त्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता, मोठ्या हिरीरीने महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांत भाग घ्यायला सुरुवात केली. बघता-बघता त्यांच्यातले नेतृत्त्वगुण विकसित झाले. दादा बडोद्याच्या महाविद्यालयातील युवकांचे नेतृत्त्व करू लागले. सरदार पटेल, साने गुरुजी, आचार्य अत्रे अशा मोठमोठ्या मंडळींची व्याख्याने त्यांनी आपल्या महाविद्यालयात आयोजित केली व ती यशस्वी करून दाखवली. बडोद्यात कला शाखेची पदवी घेतल्यानंतर ते पुण्याला आले आणि पूना लॉ कॉलेजमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात दादा आणि पुढे आमदार झालेले दत्ता देशमुख एकाच खोलीत रहायचे.
त्यावेळी देशभर महात्मा गांधींनी पुकारलेल्या ‘चले जाव’ आंदोलनाचा जोर होता. या आंदोलनात दादाही सहभागी झाले. ते राहत असलेल्या ताराबाई वसतिगृहात गुप्त बैठका चालायच्या. पोलिसांना ही बातमी कळली आणि पोलिसांनी त्यांच्या खोलीवर छापा घालून झडती घेतली. या झडतीनंतर दादांचे सहकारी दत्ता देशमुखांना अटक झाली. दत्तांच्या अटकेनंतर दादा काही काळ संगमनेरला आले. तालुक्यातील साकूर, नांदूरखंदरमाळ भागात भूमिगत राहून लोकांमध्ये गुप्तपणे ब्रिटिशांविरूध्द जनजागृतीचे अभियान राबविले.
१९४३ साली के. बी. देशमुख यांच्या कन्या प्रभावती यांच्याशी त्यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. के. बी. देशमुख हे त्यावेळचे पहिले आमदार. १९३७ साली के. बी. देशमुखांच्या प्रचारासाठी पंडित नेहरू संगमनेरला आले होते. दादांनी संगमनेरमध्ये वकिलीला सुरूवात केल्यानंतर थोड्या काळातच त्यांची अतिशय हुशार वकील म्हणून सर्वदूर ख्याती पसरली. नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात व थेट कर्नाटकमधील विजापूरपर्यंत त्यांचा नावलौकिक झाला. १९५२ मध्ये त्यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व सिव्हिल जज म्हणून धुळे जिल्ह्यात नियुक्ती झाली. परंतु नियुक्तीचा आदेश आला, त्याचवेळी काँग्रेस पक्षाने त्यांना त्या वर्षी होणा-या असेंब्लीच्या निवडणुकीला उभे राहण्याचा आदेश दिला. पक्षाचा आदेश स्वीकारून त्यांनी आपल्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला व निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला नाही. त्यानंतर १९५७ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा पक्षातर्फे उमेदवारी देण्याचे ठरले. परंतु त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. दादांना व्यक्तीश: मुंबईसह महाराष्ट्र व्हावा, असे मनापासून वाटत होते़ पण काँग्रेस पक्षाची भूमिका त्यावेळी वेगळी होती़ त्यामुळे दादांनी उमेदवारी नाकारली. पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याची भूमिका घेतली.
१९५८ मध्ये संगमनेरला सहकारी तत्त्वावर साखर कारखाना काढण्याचे ठरले. कारखान्याचे चीफ प्रमोटर म्हणून त्यांनी भागभांडवल गोळा करायला सुरूवात केली. संपूर्ण तालुका सहकारी साखर कारखान्याच्या कल्पनेने भारावून गेला. दादांच्या जोडीला सर्वश्री दत्ता देशमुख, भाऊसाहेब थोरात, भास्करराव दुर्वे, दत्ताजीराव मोरे, पंढरीनाथ आंबरे आणि त्या काळात सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेली इतर बरीच मंडळी होती. या सर्वांच्या साथीने अवघ्या सात दिवसात १८ लक्ष रूपयांचे भागभांडवल गोळा करण्यात आले. काही विघ्नसंतोषी मंडळी कारखाना उभारणीसाठी सर्वसामान्य शेतक-यांनी भागभांडवल म्हणून दिलेली शेअर्सची रक्कम परत घेण्यासाठी फूस लावीत होती. मात्र दादा आणि त्यांचे सहकारी ठाम होते. अनंत अडचणींवर मात करून पुढे जवळपास दहा वर्षांनी संगमनेर सहकारी साखर कारखाना उभा राहिला.
१९६२ मध्ये पुन्हा एकदा त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली. मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. या निवडणुकीत विजय मिळाल्यावर त्यांना लगेचच राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर १९६७, १९७२ व १९८० अशा चार निवडणुकांमध्ये त्यांनी संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले. आमदार म्हणून कार्यरत असताना बहुतांशी काळ त्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या खात्याचे मंत्रिपद असायचे. राज्याच्या मंत्रिमंडळातील सहकार, अन्न व नागरी पुरवठा, नियोजन, कृषी, परिवहन, महसूल, विधी व न्याय, प्रसिद्धी, माहिती, पाटबंधारे, सिंचन अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाची छाप उमटवली. विशेष म्हणजे १९६९ मध्ये केंद्र सरकारने प्रथमच नियोजन खात्याची जबाबदारी राज्यांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला व ‘राज्याचे पहिले नियोजन मंत्री’ म्हणून काम करण्याची संधी दादांना मिळाली. महाराष्ट्रातील अनेक धरणे व शेतक-यांच्या, कष्टक-यांच्या हिताच्या योजना ही त्यांनी महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. त्यांच्याच काळात कोल्हापूरचे दूधगंगा-वेदगंगा, सांगलीचे नांदोली, चांदोली, साता-याचे धोम, पुण्यातील चासकमान, वर्ध्यातील अप्पर वर्धा, नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी आदी धरणांच्या उभारणीची पायाभरणी झाली व त्यांच्याच काळात यातील बहुतांशी धरणे पूर्णही झाली. खरेतर त्यावेळी कुणीच इतक्या धरणांचा विचार केलेला नव्हता. परंतु नेहमीच भविष्याचा वेध घेणारी दृष्टी वापरून काम करणा-या दादांनी त्यावेळी भविष्याची पावले अचूक ओळखली होती. त्यांच्याच काळात शेतक-यांवर आयकर लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार होता. केंद्र सरकारच्या बैठकीला केवळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच निमंत्रित केले गेले होते. या बैठकीत संपूर्ण देशातून मुख्यमंत्री नसलेल्या केवळ बी. जे. खताळांनाच निमंत्रित करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे बैठकीतील सर्वच उपस्थितांनी शेतक-यांच्या आयकराला जवळपास होकार देऊन टाकला होता. केवळ दादांनी या प्रस्तावाला विरोध केला. शेतक-यांनी आयकर भरायचा म्हणजे त्यांना वर्षभर लिखापढी करावी लागणार, वर्षाच्या शेवटी आॅडिट करावे लागणार, त्यासाठी चार्टर्ड अकौंटंटकडे जावे लागणार. या सर्व गोष्टी अशिक्षित शेतक-यांसाठी केवळ कठीणच नव्हे, तर अशक्य आहेत; ही गोष्ट त्यांनी सर्वांना पटवून दिली. याला पर्याय म्हणून त्यांनी शेतक-यांनी त्यांच्या गावातील तलाठ्याकडे पीकपाणी लावताना पिकाची नोंद करणे व त्यानुसार सारा भरण्याचा पर्याय दिला. हा पर्याय स्वीकारला गेला. देशातील शेतकरी आयकराच्या जाचक नियमावली व जंजाळातून सुटला. याचे सर्व श्रेय दादांकडेच जाते.राज्याच्या मंत्रिमंडळात काम करताना दादांनी नेहमीच नियमांचे काटेकोर पालन केले. त्यांच्या या कठोर शिस्तीचा झटका अनेकांना बसला. मंत्रिमंडळात आपल्या गावातील, जिल्ह्यातील नेता असला म्हणजे आपली अनेक वैयक्तिक कामे मार्गी लागू शकतात या समजुतीतून अनेकजण त्यांच्याकडे आपली कामे घेऊन जायचे. परंतु दादांनी कुणाच्याही व्यक्तिगत कामासाठी शब्द टाकला नाही. ते आजही म्हणतात, मी गावाचा किंवा जिल्ह्याचा मंत्री नव्हतो, तर राज्याचा मंत्री होतो. त्यामुळे माझी जबाबदारी संपूर्ण राज्याप्रती एकसारखी होती. मी गावाच्या नजरेतून राज्याकडे बघत नव्हतो, तर राज्याच्या नजरेतून गावाकडे बघायचो. संपूर्ण राज्याला काही देताना नियमानुसार जे गावाच्या वाट्याला येईल तेवढेच गावाला मिळाले पाहिजे. अन्यथा माझा गाव म्हणून मी गावाला एखादी गोष्ट जास्तीची दिली, याचा अर्थ मी राज्यातील कुठल्यातरी दुस-या गावावर अन्याय केल्यासारखे होईल. त्यांच्या या शिस्तीच्या बडग्यामुळे अनेकदा कार्यकर्ते दुखावलेही जायचे. परंतु आज हेच कार्यकर्ते दादांबद्दल बोलताना त्यांच्या कर्तव्यपरायणतेचे कौतुक करतात.
त्यांची ही कठोर शिस्त व्यक्तिगत जीवनातही तितकीच काटेकोरपणे अंमलात आणली जायची. दादा मुंबईहून संगमनेरला शासकीय गाडीने यायचे; मात्र आपल्या मुलांना ते एस. टी. बसने संगमनेरला पाठवायचे. यावर त्यांचा युक्तिवाद असायचा, सरकारने त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला गाडी दिली आहे, गाडी ही माझ्या पदासाठी आहे. माझ्या मुलांचा शासकीय गाडीशी काहीही संबंध नाही. त्यांची मुले प्रवरानगरला शालेय शिक्षण घेत असताना एका कार्यक्रमासाठी दादांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. ज्या दिवशी शाळेतील कार्यक्रम होता, त्या दिवशी दादा नगरच्या दौ-यावर होते. रविवारची सुटी संपल्यावर मुले एस. टी. बसने संगमनेरहून प्रवरानगरला गेली. त्यावेळी प्रवरानगरच्या फाट्यावर बहुतेक बसेस थांबायच्या. फाट्यावर बस थांबल्यावर मुले घाईघाईने शाळेकडे निघाली. बस काहीशी उशिरा पोहोचल्याने मुले जवळपास पळतच शाळेकडे जात होती. तेवढ्यात दादांच्या गाड्यांचा ताफा नगरकडून प्रवरानगर फाट्याजवळ पोहोचला. गाडी शाळेकडे जात असतानाच दादांच्या गाडीतील एका व्यक्तीने दादांना सांगितले की, साहेब, मुले शाळेकडे पळत चालली आहेत़ त्यांना गाडीत घ्यायचे का? दादांनी तत्काळ उत्तर दिले, अजिबात नाही; त्यांच्या शाळेला उशीर होत असला तर त्यांनी लवकर निघायला हवे होते. योगायोगाने कार्यक्रमातील नियोजनाची बरीचशी जबाबदारी मुलांकडेच होती. दादा कार्यक्रमस्थळी पोहोचले. कार्यक्रम वेळेत सुरू झाला. मुले थोडीशी उशिरा धावत-पळत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली. कार्यक्रम संपल्यावर दादा मुख्याध्यापकांकडे गेले आणि मुले जर शाळेत उशिरा पोहोचली तर आपण काय शिक्षा करता असे विचारले. मुख्याध्यापकांनी आम्ही आर्थिक दंड करीत असल्याचे सांगितले. दादांनी तत्काळ खिशातून पैसे काढले व सांगितले, आजच्या कार्यक्रमाला माझी मुले उशिरा आली़ त्यांच्या दंडाची पावती फाडा. मुख्याध्यापक अवाक होऊन बघतच राहिले! इतक्या काटेकोर शिस्तीचे राज्यकर्ते आजच्या युगात अपवाद म्हणूनही सापडणार नाहीत.
दादांच्या या काटेकोरपणामुळेच त्यांच्या दीर्घ राजकीय जीवनात विरोधकांच्या आरोपांना सामोरे जावे लागले नाही. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींशी अतिशय सलोख्याचे संबंध असूनही केवळ राज्याच्या राजकारणात स्वत:चा स्वतंत्र गट बनवणे त्यांना पसंत नसल्याने ते राज्याच्या सर्वोच्च पदापासून दूर राहिले. राज्यात ज्या-ज्या वेळी कठीण प्रसंग आले, अशा वेळी मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक या मुख्यमंत्र्यांना दादाच सर्वाधिक जवळचे वाटायचे. १९६२ पासून ते १९८५ पर्यंत त्यांनी राज्याच्या आठ मुख्यमंत्र्यांसमवेत काम केले. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी स्वत:ची तत्व आणि मूल्य यांना सर्वाधिक प्राधान्य दिले.
१९८० ची निवडणूक जिंकल्यावर त्यांनी ‘ही आपली शेवटची निवडणूक’ असल्याची घोषणा केली व त्यानुसार १९८५ मध्ये निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर त्यांनी स्वत:ला योगासने, विपश्यना, वाचन, चिंतन यात गुंतवून घेतले़ सध्या वयाच्या १०१ व्या वर्षी ते विविध विषयांवर लिखाण करीत आहेत. २०११ मध्ये त्यांचे ‘अंतरीचे धावे’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाला महाराष्ट्रभर विशेष प्रतिसाद मिळाला. २०१२ मध्ये ‘गुलामगिरी’ व ‘धिंड लोकशाहीची’ या वैचारिक पुस्तकांचे प्रकाशन झाले. अल्पावधीतच ही दोन्ही पुस्तकेही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहेत. यानंतर त्यांची ‘गांधीजी असते तर, लष्कराच्या विळख्यातील पाकिस्तान’ ही पुस्तके प्रकाशित झाली. वयाच्या शंभरीत एखादे पुस्तक लिहून ते त्याच वर्षी प्रकाशित करण्याचा विक्रम दादांच्याच नावावर आहे. त्यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी ‘माझे शिक्षक’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
राजकारणातील कृतिशिल आदर्श व्यक्तिमत्त्व
महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते ८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सक्रियपणे वावरणा-या दादांनी महाराष्ट्राची सर्वच महत्त्वाची स्थित्यंतरे अनुभवली आहेत. वकिलीच्या क्षेत्रात काम करताना संगमनेर परिसरातील सर्वोत्तम वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. थेट कर्नाटकापर्यंत त्यांची वकिली चालायची. राजकारणात उतरल्यावर पराकोटीची शिस्त, स्वत:ची काही जीवनमूल्य यांची सांगड घालून त्यांनी राजकारणातही स्वत:च्या कृतीतून आदर्श निर्माण केला. आज दादा वयाच्या १०१ व्या वर्षीदेखील युवकांना लाजवेल, अशा पद्धतीने आपले जीवन जगत आहेत. योगाभ्यास, वाचन, चिंतन-मनन व यातून साकारलेले लेखन अशा एक ना अनेक गोष्टींत त्यांनी स्वत:ला व्यग्र ठेवले आहे. म्हणूनच ते निरोगी, आनंदी तर आहेतच परंतु समाधानीही आहेत. सध्याच्या राजकारणाकडेही त्यांचे सजगपणे लक्ष आहे. राजकारणातील विचारधारा बहुतांशी ठिकाणी संपली आहे. पक्ष निष्ठा, पक्ष विचार याकडे कुणाचेच लक्ष नाहीये. केवळ कुणाकडे किती डोकी आहेत, याला महत्व आल्याने फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. दादा पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि त्यांनी काही प्राण्यांची प्रतीके वापरून सध्याच्या राजकारणावर एक नवे पुस्तक लिहायला सुरुवात केली आहे. वयाच्या शंभरीनंतर दादांना लोकांना ठामपणे काहीतरी सांगायचे आहे. दादांचा अचानक मला फोन येतो, ‘संतोष आज तुम्हाला वेळ आहे का? मला फ्रेंच राज्यक्रांती वाचायची आहे. काही संदर्भ मिळाले तर त्याचे प्रिंट घेऊन या. आपण एक-दोन दिवसात चर्चेला बसू़’ मी चकित झालो़ कुठून येते ही ऊर्जा? दादा आपल्या येऊ घातलेल्या पुस्तकात राजकीय क्रांतीबाबत काहीतरी सांगणार आहेत, हे नक्की़ कारण नैतिक अधिष्ठान असलेल्या माणसांनाच समाजाचे (नेत्यांचे सुद्धा) कान धरून, बाबा रे, तू चुकतो आहेस, हे सांगण्याचा अधिकार असतो. पुढची अनेक वर्षे दादा हा नैतिक अधिकार वापरोत़ कारण आता असा अधिकार वापरू शकणारी सर्वाधिक ज्येष्ठ आणि पात्र व्यक्ती दुसरी कोण आहे ?
परिचय
जन्म : २६ मार्च १९१९
गाव : धांदरफळ खुर्द (ता़ संगमनेर)
शिक्षण : एलएलबी
भूषविलेली पदे
- १९४२ : चले जाव आंदोलनात सहभाग
- १९४३ : वकिलीला सुरुवात
- १९५२ : न्यायाधीशपदी नियुक्ती व राजीनामा
- १९६२ : आमदार म्हणून निवड
- १९६७, १९७२, १९८० : आमदार व मंत्रीमंडळात स्थान
- १९८५ : राजकारणातून निवृत्ती
लेखन
आंतरीचे धावे, गुलामगिरी, धिंड लोकशाहीची, गांधींजी असते तर, लष्कराच्या विळख्यातील पाकिस्तान, माझे शिक्षक या पुस्तकांचे लेखन
लेखक- डॉ. संतोष खेडलेकर ( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत )