विजेच्या लपंडावामुळे जेऊरच्या शेतकऱ्यांंचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:25 AM2021-09-17T04:25:44+5:302021-09-17T04:25:44+5:30

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयात बुधवारी सर्व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी अधिकाऱ्यांविरोधात संताप ...

The farmers of Jeur are outraged over the power outage | विजेच्या लपंडावामुळे जेऊरच्या शेतकऱ्यांंचा आक्रोश

विजेच्या लपंडावामुळे जेऊरच्या शेतकऱ्यांंचा आक्रोश

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयात बुधवारी सर्व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. कांदा लागवड सुरू असताना विजेचा लपंडाव सुरू असल्याने महावितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी आक्रोश केला.

जेऊर परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यास विलंब होत आहे. परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या मशागतीसाठी वापसा झालेला आहे. परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वीज नसल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी जेऊर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. तेथे कोणीही लाईनमन अथवा अधिकारी उपस्थित नव्हते. वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असता फोन घेतले जात नव्हते. कार्यालयातील दूरध्वनी ही अनेक दिवसांपासून बंदच आहे. शेतकऱ्यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा फोन बंद होता.

यावेळी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. यापुढे कामात हलगर्जीपणा केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

---

कनिष्ठ अभियंत्याची बदली करा

जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याचे कोणतेही कर्मचारी ऐकत नाहीत. त्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. कामकाजात सुसूत्रता नाही. त्यामुळे येथील कनिष्ठ अभियंत्याची तत्काळ बदली करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

----

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

कांदा लागवडीसाठी मजूर शेतामध्ये आल्यानंतर वीज नसल्याने कांदा लागवड कोरड्यात करावी लागत आहे. अथवा मजूर बसून राहतात. मजूर बसून राहिले तरी शेतकऱ्यांना त्यांची मजुरी द्यावीच लागते. अन्यथा इंजिनच्या साहाय्याने कांदा लागवड करावी लागते. त्यातही डिझेलचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडतो. याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

---

कार्यालयाला टाळे ठोकणार

जेऊर येथे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपसरपंच श्रीतेश पवार व माजी उपसरपंच बंडू पवार यांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडण्यास सांगितले. तसेच यापुढे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास जेऊर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: The farmers of Jeur are outraged over the power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.