ग्रामीण भागात हार्वेस्टरवाल्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 04:50 PM2020-04-11T16:50:54+5:302020-04-11T16:51:35+5:30
त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना हार्वेस्टर मालकांनी भाव अचानक वाढवल्यामुळे आणखी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
अमोल म्हस्के
पागोरी पिंपळगाव : सध्या ग्रामीण भागात शेतीचे कामे सुरू आहेत. गहू सोगंणीची कामे जोरात सुरू आहेत, परंतु या लॉकडाऊन काळात शेतमजूर मिळत नाहीत. परराज्यातून दरवर्षीप्रमाणे येणारे हार्वेस्टर मशीन यावर्षी आले नसल्याने स्थानिक हार्वेस्टरवाल्यांनी भाव वाढवले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना हार्वेस्टर मालकांनी भाव अचानक वाढवल्यामुळे आणखी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे. ग्रामीण भागात शेतातील उभे पीके सोंगणीच्या कामांनी सध्या जोर पकडला आहे. ग्रामीण भागात गहू काढण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर करतात. हार्वेस्टर मशीन मालकाकडून, चालकाकडून भावही वाढवण्यात आला आहे. शेतातील उत्पादित धान्य, कांदा , फुले ,फळे, बहुतांशी भाजीपाला व इतर शेतीत उत्पादन होणाऱ्या वस्तू, मार्केट बंद असल्यामुळे बाजारात नेता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक कमाई सध्या बंद आहे. पंधरा-वीस दिवसातच प्रति एकर पाचशे, सहाशे रुपये भाव अधिक वाढवला आहे. पूर्वी गहू काढण्यासाठी प्रती एकर पंधराशे ते सोळाशे असा भाव होता. परंतु आता हाच प्रति एकर भाव २००० व त्यापुढे गेला आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना परत एकदा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.