करोडीत चारा छावणीसाठी शेतक-यांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:54 AM2019-01-02T11:54:12+5:302019-01-02T11:54:22+5:30
तालुक्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा छावण्या सुरु करावी.
पाथर्डी : तालुक्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा छावण्या सुरु करावी. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी त्वरित उपाय योजना करण्याच्या मागणीसाठी करोडी येथे पाथर्डी-बीड राज्य महामार्गावर सकाळी आम आदमी पार्टी व शेतक-यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या तीन वर्षापासून पुरेसा पाऊस नसल्याने जनावरांसाठी चारा छावण्या व जनावरासाठी टँकरने पाणी पुरवठा सुरु करावा. गरीब शेतक-यांना पेन्शन व हाताला काम, शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी, रखडलेली जलयुक्तची कामे पूर्ण करण्यात यावीत. विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक फी माफी, उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे सुरु करण्यात यावीत मुळा, जायकवाडी धरणाचे पाणी पूर्व भागातील शेतीसाठी मिळावे. शेतीमालाला हमी भाव देण्यात यावा यासह इतर काही मागण्यासाठी आंदोलकांनी टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर अभंग, भारुडे गायन करत दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. निवेदन नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना दिले.
यावेळी आमआदमी पार्टीचे किसन आव्हाड, सुनील पाखरे, बाबुराव खेडकर, योगेश गोल्हार, लक्ष्मण गोल्हार, रेवणनाथ खेडकर, शिवनाथ वारे, सचिन वारे, सयाजी वारे, रघुनाथ गोल्हार, विक्रम गोल्हार, आदिनाथ खेडकर यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळीच अचानक झालेल्या रास्तारोको मुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.