शेतक-याने सरकारची मदत नाकारली; दहा हजारांचा मुख्यमंत्र्यांनाच पाठविला धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 04:35 PM2020-10-28T16:35:05+5:302020-10-28T16:36:17+5:30
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतक-यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देऊन थट्टा केल्याचा आरोप एका शेतक-याने केला. त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दहा हजार रुपयांचा धनादेश तहसीलदारांच्या वतीने पाठविला.
श्रीरामपूर : राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतक-यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देऊन थट्टा केल्याचा आरोप एका शेतक-याने केला. त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दहा हजार रुपयांचा धनादेश तहसीलदारांच्या वतीने पाठविला. गांजा लागवडीची परवानगी दिल्यास भविष्यात शेतकरी कधीही सरकारकडे मदतीची याचना करणार नाहीत, अशी टीका त्याने केली आहे.
निलेश शेडगे असे या शेतक-याचे नाव आहे. बुधवारी त्यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे कॅनरा बँकेचा धनादेश सुपूर्द केला. त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यात सरकारची मदत ही तुटपुंजी असून त्यातून कोणताही आधार मिळणार नाही, असे स्पष्ट केले. त्याचा आपण निषेध करत आहोत. त्यामुळे सरकारला दहा हजार रुपयांचा महसूल दिला, असे निवेदनात म्हटले आहे.
शेतक-यांना जर गांजा आणि खसखस पिकविण्याची परवानगी दिली तर सरकारी मदतीची गरज पडणार नाही. त्यातून ते सक्षम होतील, असे शेडगे यांचे म्हणणे आहे.