शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By Admin | Published: September 4, 2014 11:05 PM2014-09-04T23:05:33+5:302024-10-18T18:55:41+5:30
सोबलेवाडी येथील शेतकरी बबन राजाराम सोबले या शेतकऱ्याने आमदार विजय औटी यांच्या संपर्क कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
पारनेर : तलाठ्याच्या दिरंगाईमुळे राज्य सरकारकडून आलेले नांगरट व मशागतीचे अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ सोबलेवाडी येथील शेतकरी बबन राजाराम सोबले या शेतकऱ्याने आमदार विजय औटी यांच्या संपर्क कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर शेतकऱ्याला अटक करण्यात आली. गुरूवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, पारनेर जवळील सोबलेवाडी येथील बबन राजाराम सोबले या शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावावर दुष्काळामुळे राज्य सरकारने दिलेले नांगरटीचे व मशागतीचे अनुदान वर्गच झाले नाही. तलाठ्याकडून काही चुका झाल्याने अनुदान रखडले व सोबलेवाडी येथील इतर शेतकऱ्यांना अनुदान मिळाले, अशी सोबले यांची तक्रार आहे.
गुरूवारी सकाळी अकरा वाजता बबन सोबले यांनी पारनेर येथील वेशीनजीक असलेल्या आमदार औटी यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांना माहिती दिली. औटी यांनीही तातडीने याची दखल घेऊन तहसील कार्यालयाशी संपर्क साधला. यावेळी शेतकरी सोबले कार्यालया बाहेर गेले व हातातील रॉकेलच्या बाटलीतून रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
ही घटना पाहताच आ. औटी यांचे स्वीय सहाय्यक योगेश वाघ, चालक आयाज राजे, गिरीश साळवे यांनी तातडीने शेतकऱ्याच्या हातातील रॉकेलची बाटली व काडीपेटी काढून घेतली.
घटनेनंतर पारनेर पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी योगेश वाघ यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार सोबले यांच्यावर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
अनुदान मिळणे कठीण
शेतकरी बबन सोबले यांनी जरी आत्मदहनाचा प्रयत्न केला तरी पारनेरच्या तलाठ्याची बदली झाल्याने तेथे नवीन तलाठयाची नेमणूक आहे.
नवीन तलाठी अजून हजर नसल्याने सोबले यांना सध्यातरी हे अनुदान तातडीने मिळणे अवघड आहे.
(तालुका प्रतिनिधी)
पहिल्यांदा भेट
बबन सोबले नांगरट व मशागतीचे अनुदान मिळाले नाही म्हणून पूर्वी आमदार औटी यांना भेटले नाहीत. गुरूवारी प्रथमच ते संपर्क कार्यालयात आले व त्यानंतर त्यांनी हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला.
योगेश वाघ,
आ.औटी यांचे स्वीय सहाय्यक
टोलवाटोलवी
मी माझे व वडिलांच्या नावावरील मशागत व नांगरटीचे अनुदान बँकेत जमा नाही म्हणून पारनेरच्या तलाठ्याकडे चौकशी केली. त्यावेळी अनुदान बँकेत वर्ग झाल्याचे सांगण्यात आले. बँकेत गेल्यावर अजून तुमचा धनादेश आला नाही, असे सांगण्यात येत होते.यामुळे वैतागून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
बबन सोबले,
आंदोलक शेतकरी