शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:53+5:302020-12-22T04:19:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावे, असे आवाहन कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी केले आहे.
आढाव म्हणाले, राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित सर्व प्रकारची अवजारे, पॉवर टिलर (छोटा ट्रॅक्टर) तसेच कांदा चाळ, शेततळे, शेततळे अस्तरीकरण अशा विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावयाचा आहे. ही नोंदणी करताना गावातील सेतू कार्यालयात अर्ज करता येतो. या अर्जासाठी शेतकऱ्याने सातबारा उतारा, खाते उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्डशी संलग्न मोबाइल क्रमांक महत्त्वाचा आहे. तसेच अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती या वर्गातील लाभार्थींचा जातीचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत या महिन्याच्या अखेरीस ३१ डिसेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योजनेत सहभाग घ्यावा, असेही आढाव यांनी म्हटले आहे.