शेतक-यांना विमा भरपाई मिळावी - राधाकृष्ण विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 06:43 PM2019-05-08T18:43:24+5:302019-05-08T18:44:07+5:30
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदतीत पीकविमा भरुनही शेतक-यांना या विमा योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.
राहाता : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदतीत पीकविमा भरुनही शेतक-यांना या विमा योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. ऐन टंचाईच्या काळात विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहीलेल्या 8 हजार 462 शेतक-यांना झालेल्या आर्थिक भुर्दडांचे गांभीर्य लक्षात घेऊन या शेतक-यांना विमा भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या कृषि आयुक्तांकडे केली आहे.
कृषि आयुक्त सुहास दिवसे यांना विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी आकडेवारीसह पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित राहीलेल्या शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून 10 हजार 19 कर्जदार आणि 7 हजार 956 बिगर कर्जदार अशा एकूण 17 हजार 975 शेतक-यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचीत हवामान आधारित फळपीकविमा योजनेत सहभाग घेवून 7 कोटी 55 लाख 62 हजार रुपयांचा विमा हप्ता भरणा केला होता. मात्र कर्जदार शेतक-यांपैकी फक्त 9 हजार 448 शेतक-यांनाच विमा रक्कम मंजूर झाली. यापैकी 571 शेतकरी भरपाईपासून वंचित राहीले आहेत तर बिगर कर्जदार शेतक-यांपैकी फक्त 65 शेतक-यांना विमा रकमेचा लाभ मिळाला असल्याने एकूण 8 हजार 462 शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहीले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सर्व शेतकरी विमा भरपाई मिळण्यासाठी पात्र असताना त्यांना लाभापासून वंचित ठेवने अयोग्य आहे याबाबत आपण गांभियार्ने लक्ष घालून शेतक-यांना विमा भरपाई रक्कम मिळवून द्यावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.