शेतक-यांनी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञान वापरावे; डॉ. सी. वासुदेवप्पा यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 03:42 PM2020-06-06T15:42:40+5:302020-06-06T15:43:31+5:30
शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोनीपत (हरियाणा) येथील अन्न तंत्रज्ञान व्यवसायीकरण व व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरु डॉ. सी. वासुदेवप्पा यांनी केले.
राहुरी : शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोनीपत (हरियाणा) येथील अन्न तंत्रज्ञान व्यवसायीकरण व व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरु डॉ. सी. वासुदेवप्पा यांनी केले.
जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठात हवामान अद्ययावत शेती, जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत स्मार्ट प्रक्रिया तंत्रज्ञानातील प्रगती या विषयावर दोन आठवड्यांचे आॅनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी शनिवारी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. वासुदेवप्पा बोलत होते.
अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील शेतकरी कल्याण मंत्रालयाचे उपमहासंचालक डॉ.के.के.सिंग,डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ.दिलीप पवार, डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, डॉ.मिलिंद अहिरे, डॉ.उत्तम चव्हाण, डॉ.सुनील गोरटीवार, डॉ.मुकुंद शिंदे, प्रशिक्षणाचे आयोजन डॉ.विक्रम कड उपस्थित होते.
शेतीमालापासून विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धीत पदार्थ बनविल्यास लोकांना चांगल्या प्रतिचे पदार्थ खाण्यास मिळतील. त्यांचे आरोग्य चांगले राहिल. सद्यस्थितीमध्ये भारतात शेतीमालाच्या नुकसानीचे प्रमाण खूप मोठे आहे. जवळपास ३० ते ४० टक्के नुकसान शेतीमालाच्या काढणी केल्यापासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत होते. त्याला असंख्य कारणे आहेत. त्यातील महत्वाचे कारण शेतीमालाची हाताळणी हे होय. त्यासाठीच नवीन तंत्रज्ञानाचा पवार करण्याची गरज आहे, असेही वासुदेवप्पा यांनी सांगितले.