पाण्यासाठी शेतकरी गाळात : भीमा नदीकाठावरील शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 07:35 PM2019-04-22T19:35:54+5:302019-04-22T19:36:55+5:30
कर्जत, श्रीगोंदा तालुक्याच्या दक्षिण भागास वरदान ठरलेले उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरूनही नियोजनाअभावी रिकामे झाल्याने शेतकऱ्यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नदीतील गाळ बाजूला करून विद्युतपंप सुरू ठेवावे लागत आहेत.
सिद्धटेक : कर्जत, श्रीगोंदा तालुक्याच्या दक्षिण भागास वरदान ठरलेले उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरूनही नियोजनाअभावी रिकामे झाल्याने शेतकऱ्यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नदीतील गाळ बाजूला करून विद्युतपंप सुरू ठेवावे लागत आहेत.
भीमा नदीवरील उजनी जलाशय यावर्षी १०९ टक्के भरूनही जलसंपदा विभागाच्या नियोजनाअभावी पाणी साठा हा जलाशय आता रिकामा झाला आहे. पाणी संपत आल्याने पिकांना शेवटचे पाणी देण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. त्यासाठी त्यांना नदीतील गाळ बाजूला करून पाईप टाकून विद्युतपंप पुढे घ्यावे लागत आहेत. पाण्याबरोबर गाळ, शंख शिंपले आल्याने ते विद्युत पंपाच्या फुटवॉलला बसत असल्याने ते काढण्यासाठी शेतकऱ्यांना या गाळमिश्रीत पाण्यात बसूनच राहिले तरच, विद्युत पंप सुरळीत चालतात.
हाता तोंडला आलेले पीक एका पाण्यासाठी हातचे जायची वेळ आली आहे. उजनी जलाशयाच्या इतिहासात पूर्ण भरूनहीे ते पूर्णपणे रिकामे होण्याची ही पहिली वेळ आहे. पाणी कमी होत असल्याने विद्युतपंप सुरू ठेवणे गरजेचे आहे. यामुळे लोकसभा निवडणूकरूपी लोकशाहीच्या मोठ्या सणात आम्हा शेतकºयांना आनंदाने सहभागी होता येत नाही, याची खंत आहे. -विठ्ठल जगताप, शेतकरी भांबोरा.