नगर जिल्ह्यात एकाच दिवसी दोन कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 06:45 PM2017-11-15T18:45:26+5:302017-11-15T19:01:52+5:30
नगर तालुक्यातील मेहेकरी गावात सुभाष आप्पा बडे (वय ५०) या शेतक-याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. जामखेड तालुक्यातही शेतकरी बाबासाहेब राऊ गोयकर (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
केडगाव/ जामखेड : नगर तालुक्यातील मेहेकरी गावात सुभाष आप्पा बडे (वय ५०) या शेतक-याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. जामखेड तालुक्यातील गोयकरवाडी येथील शेतकरी बाबासाहेब राऊ गोयकर (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सावकाराने बडे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बडे कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. बडे यांच्या जवळ सावकाराच्या नावाने चिठ्ठी सापडली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
मयत सुभाष बडे यांच्या खिशात ही चिठ्ठी सापडल्याने पोलीस आता खासगी सावकारांच्या विरोधात काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेहेकरी येथील गावक-यांनी बडे यांना शिवीगाळ करणा-या सावकाराच्या विरोधात संताप व्यक्त केल्याने तो फरार झाल्याचीही माहिती समजली आहे.
मयत बडे यांच्यावर खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज जवळपास एक ते दीड लाख रुपये होते. तो सावकार त्यांच्याकडून दहा ते पंधरा टक्के व्याजाने पैसे वसूल करीत होता. सध्या आर्थिकदृष्ट्या बडे अडचणीत असल्याने वेळोवेळी व्याज देता येत नसल्याने सावकाराने थेट बडे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली होती. याचा त्रास बडे यांना झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून सावकाराला योग्य शिक्षा व्हावी अशी मागणी गावातून केली जात आहे. दरम्यान बडे यांच्या आत्महत्येबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या घटनेमुळे मेहेकरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खासगी सावकारांची वसुुली
नगर तालुक्यातील अनेक गावांत काही ठराविक सावकार दहा ते पंधरा टक्क्याने गोरगरिबांना पैसे देऊन दामदुप्पट वसूल करतात. त्यामुळे वेळेत पैसा सावकाराकडे जात नाही. त्यामुळे आणखीच शेतकरी कर्जबाजारी होतो आहे. कर्जाचा आकडा दिवसेंदिवस फुगत जाऊन ते फेडणे गोरगरिबांना अशक्य होते. सावकाराचा वसुलीसाठी जाच सुरू होतो.या त्रासातून गोरगरीब आत्महत्या करीत असल्याने या सावकारशाही विरोधात आता कार्यवाही होणार का असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.
गोयकरवाडीतही कर्जबाजारी शेतक-याने घेतला गळफास
जामखेड : तालुक्यातील गोयकरवाडी येथील शेतकरी बाबासाहेब राऊ गोयकर (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आला. गोयकर यांनी स्वत:च्या शेतातच आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. गोयकर यांना अडीच एकर जमीन आहे. त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबतची खबर पोलीस पाटील कांतिलाल वाळुंजकर यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण यांनी पंचनामा केला. बुधवारी दुपारी गोयकर यांच्यावर त्यांच्याच शेतात अंत्यविधी करण्यात आला. गोयकर यांच्यामागे वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.