पंचनामे न केल्याने शेतक-यांनी रस्त्यावर फेकली संत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:24 PM2020-03-04T12:24:52+5:302020-03-04T12:25:38+5:30

खडकी परिसरातील संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले. परंतु कोणताही प्रशासकीय अधिकारी नुकसान पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी मंगळवारी सकाळी वादळी वा-याने गळालेली संत्री रस्त्यावर फेकून आंदोलन केले आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

Farmers threw orange on the road due to non-punctuation | पंचनामे न केल्याने शेतक-यांनी रस्त्यावर फेकली संत्री 

पंचनामे न केल्याने शेतक-यांनी रस्त्यावर फेकली संत्री 

अहमदनगर : नगर तालुक्यातील काही भागात रविवारी रात्री वादळी वारा आणि अवकाळी गारपिटीचा तडाखा बसला. त्यात खडकी परिसरातील संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले. परंतु कोणताही प्रशासकीय अधिकारी नुकसान पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी मंगळवारी सकाळी वादळी वा-याने गळालेली संत्री रस्त्यावर फेकून आंदोलन केले आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
नगर तालुक्यातील खडकी परिसराला संत्रा फळबागांचे आगर मानले जाते. खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा, धोंडेवाडी, सारोळा कासार या भागात मोठ्या प्रमाणावर संत्रा फळबागा आहेत. खडकी परिसरात ५०० एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर संत्रा फळबाग आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास या भागात मोठ्या प्रमाणावर वारा व तुरळक पाऊस झाल्याने तोडणीला आलेल्या फळबागांचे मोठे नुकसान झाले. 
सोमवारी माहिती होऊनही कोणताही प्रशासकीय अधिकारी या भागात पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी मंगळवारी सकाळीच गळालेल्या फळांसह नगर- दौंड रस्त्यावर आंदोलन सुरू केले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, राहुल बहिरट, ग्रामपंचायत सदस्य महेश कोठूळे, उपसरपंच रोकडे, केतन निकम, ऋषी कोठूळे, राहुल कोठूळे, अशोक कोठूळे, अमृत कोठूळे, नवनाथ कोठूळे, रतन बहिरट, अर्जुन रोकडे, आदिनाथ गायकवाड, प्रवीण कोठूळे, सुनील कोठूळे, भाऊसाहेब खेंगट यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ यांनी शेतक-यांची समजूत काढली. सरकार आपले आहे. आपण या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे प्रशासनास करण्यास सांगू, असे सांगत आंदोलन न करण्याची विनंती केली. शेतकºयांनीही आंदोलन मागे घेत फळे रस्त्यावर फेकून प्रशासकीय धोरणांचा निषेध केला व तातडीने पंचनामे करत हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

Web Title: Farmers threw orange on the road due to non-punctuation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.