वाळूच्या नावाखाली शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पकडण्याचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:16+5:302021-02-13T04:20:16+5:30
करंजी : परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढली असून, ट्रॅक्टरने खत, माती नेण्याचे काम शेतकरी करीत आहेत. वाळू पकडण्याच्या नावाखाली ...
करंजी : परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढली असून, ट्रॅक्टरने खत, माती नेण्याचे काम शेतकरी करीत आहेत. वाळू पकडण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचेे ट्रॅक्टर अधिकारी व पोलीस धरून कारवाई करत आहेत. काही ट्रॅक्टर चालक, शेतकऱ्यास मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ नये, म्हणून शेतकरी गप्प बसून आहेत. दरम्यान, याबाबत शिवसेनेच्या वतीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
करंजी परिसरातील जोहारवाडी, कौडगाव, देवराई, लोहसर-खांडगाव, घाटसिरस आदी अनेक गावांच्या परिसरात शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीत गुंतला आहे. आपल्या शेतीत खते, पोयटा (माती) ट्रॅक्टरने टाकीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या अशा ट्रॅक्टरला अधिकारी व पोलिसांचे पथक अडवून शेतकऱ्यांना दमबाजी करून त्यांच्यावर कारवाई करीत असल्याने, या भागातील शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात शेवगावच्या पोलीस पथकाने परिसरात खासगी वाहनाने फिरून ट्रॅक्टर चालक शेतकऱ्यास दमबाजी करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत या भागातील शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे. वाळूच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलिसांवर कारवाई करावी, याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच एक शिष्टमंडळ भेटणार असल्याचेही रफिक शेख यांनी सांगितले.
...
रस्ता रोकोचा इशारा
महसूल खात्याचे काम करणाऱ्या या पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी न झाल्यास, शेतकऱ्यांसाठी शिवसेनेच्या वतीने करंजी येथे रस्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रफिक शेख, ग्रामपंचायत सदस्य बाबा गाडेकर, रोहित अकोलकर, सुनील अकोलकर, आबासाहेब अकोलकर, गजानन गायकवाड, विक्रम अकोलकर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.
....
वाळूच्या नावाखाली शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पकडण्याचे सत्र महसूल, पोलीस पथकाकडून सुरू आहे, याबाबत आमच्याकडे कसलीही तक्रार किंवा निवेदन आलेले नाही. निवेदन आल्यानंतर माहिती घेऊन विचार करू.
- पंकज नेवसे, नायब तहसीलदार, पाथर्डी