शेतामध्ये पाणी पोहचल्यानंतरच शेतकरी स्वाभिमानी बनेल : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 04:21 PM2019-05-09T16:21:25+5:302019-05-09T16:21:36+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजना, ऊसापासून इथेनॉलची निर्मिती आणि नदीजोड प्रकल्पाच्या स्विकारलेल्या धोरणामागे स्व.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार आहे.
लोणी : प्रधानमंत्री पीक विमा योजना, ऊसापासून इथेनॉलची निर्मिती आणि नदीजोड प्रकल्पाच्या स्विकारलेल्या धोरणामागे स्व.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार आहे. इतरांसारखे शेतक-यांना केवळ मोर्चे काढायला आम्ही लावले नाहीत, शेतक-यांची सुरक्षितता देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.वाजपेयी सरकारने हाती घेतलेले धोरण पुन्हा एकदा केंद्र सरकारने पुढे नेण्यास प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रकात पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या 87 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून लोणी ग्रामस्थ आणि प्रवरा परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात पाटील बोलत होते. माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास पालकमंत्री प्रा.राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, नाबार्डचे माजी चेअरमन डॉ. यशवंत थोरात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, सभापती दिपकराव पठारे, सुभाषराव पाटील, राजेश परजणे, अशोकराव भांगरे उपस्थित होते. कारखाना कार्यस्?थळावरील पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पाजंली अर्पन करुन अभिवादन केले.
पाटील म्हणाले, केवळ कर्जमाफी देवून शेतक-यांचे प्रश्न सुटणार नाहीत तर, शेतामध्ये पाणी पोहचल्यानंतरच शेतकरी स्वाभिमानी बनेल. यासाठीच जलयुक्त शिवाराचा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला. राज्य सरकारचे हे धोरण म्हणजे डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या विचारांशी सुसंगत असे आहे. केंद्र सरकारने आता केवळ पाण्यासाठी 24 हजार कोटी रुपयांची उपलब्धता करुन दिली असून, या माध्यमातून बंद पडलेले जलसिंचन प्रकल्प सुरु करण्यास प्राधान्य दिले गेले आहे. मधल्या काळात देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्यांकडून शेतक-यांचा विचार झालाच नाही.