शेतकऱ्यांना मिळणार मोफत तृणधान्याच्या ६९ हजार बियाणे किट, कृषी विभागाशी संपर्काचे आवाहन
By साहेबराव नरसाळे | Published: June 23, 2023 07:19 PM2023-06-23T19:19:34+5:302023-06-23T19:19:46+5:30
कृषी विभागाच्या वतीने ‘शेत तेथे पौष्टिक तृणधान्य’ मोहिमेतर्गंत जिल्ह्यात तृणधान्य बियाणांचे ६९ हजार ६६ मिनिकिटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
अहमदनगर: कृषी विभागाच्या वतीने ‘शेत तेथे पौष्टिक तृणधान्य’ मोहिमेतर्गंत जिल्ह्यात तृणधान्य बियाणांचे ६९ हजार ६६ मिनिकिटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तृणधान्याची लागवड करावी. मोफत बियाणे मिनिकिट प्राप्त करून घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना बोराळे म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३-२४ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढ करण्याच्या हेतूने पौष्टिक तृणधान्य मिनिकिट वाटप व मिलेट क्रॉप कॅफेटिरीया बाबींची अंमलबजावणी २०२३- २४ वर्षामध्ये करण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांचे मार्गदर्शनाखाली पौष्टिक तृणधान्याचे आहारामधील महत्वाबाबत जागृती व्हावी व लोकांना कमी किंमतीत मुबलक प्रमाणात तृणधान्य उपलब्ध व्हावेत.यासाठी ‘शेत तेथे पौष्टिक तृणधान्य’ मोहिमेंअंतर्गत जिल्ह्यात ६५५६० मिनिकिटचे व मिलेट क्रॉप कॅफेटिरीया अंतर्गत ३५०६ मिनिकिटचे मोफत वाटप केले जाणार आहे. या अभियानातून उत्पादित होणारे तृणधान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वापरता येणार आहे तसेच बियाणे म्हणूनही पुढील वर्षी वापर करता येणार आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह व पोटाच्या विकाराचे प्रमाणे खुप वाढले आहे. त्यामुळे आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राजगिरा, राळा अशा तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थाचे महत्त्व सुद्धा वाढू लागले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तृणधान्य पिकाच्या बियाणे मिनिकिटची लागवड करावी. बियाणे मिनिकिट मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बोराळे यांनी केले आहे.