जिल्ह्यात शस्त्र परवान्याची फॅशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:47+5:302021-07-07T04:25:47+5:30
श्रीरामपूर : जिल्ह्यात काही मंडळींसाठी शस्त्र बाळगण्याची जणू काही फॅशनच आता रूढ झाली आहे. त्यामुळे परवानाधारक शस्त्रांची संख्या आता ...
श्रीरामपूर : जिल्ह्यात काही मंडळींसाठी शस्त्र बाळगण्याची जणू काही फॅशनच आता रूढ झाली आहे. त्यामुळे परवानाधारक शस्त्रांची संख्या आता तीन हजार ८२६वर पोहोचली आहे. यामध्ये व्यावसायिक तसेच राजकीय नेत्यांचा समावेश आहे.
स्वसंरक्षणाची गरज भासल्यानंतर परवाने मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यातूनच जिल्ह्यात ही संख्या वाढली आहे. यामध्ये हॉटेल व्यावसायिकांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर सुरक्षा एजन्सींकडेही परवानाधारक शस्त्रे आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात ही शस्त्रे स्थानिक पोलीस ठाण्यात जमा केली जातात.
------
शस्त्र परवाना काढायचा कसा?
परवाना काढण्याची प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची आहे. त्यासाठी शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. त्याचे प्रमाणपत्रही आवश्यक असते. सुरक्षितस्थळी शस्त्र ठेवण्यासाठी उचित जागा हवी. अर्जदार हा शारीरिक तंदुरुस्त असला पाहिजे. चारित्र्य पडताळणी व इतर ओळखीचे कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यानंतरच परवाना अदा केला जातो.
-----------
शस्त्र सांभाळणे कठीण
परवानाधारक शस्त्रे सांभाळणे ही कठीण गोष्ट असते. जुन्या शस्त्रांमध्ये लॉक करण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे त्यातून अनावधानाने गोळी सुटण्याचा धोका होता. मॅगझिन असलेल्या पिस्तुलामध्ये गोळी लॉक होते. आता मात्र नवीन शस्त्रांमध्ये लॉकिंगची सोय असते. लॉक उघडून ट्रिगर दाबल्यावरच गोळी सुटते.
------
गुन्हेगारी पार्श्वभूमी नको
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ६७ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. त्याविरोधात ही मंडळी अपिलात गेले आहेत. त्यावर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.
-------------