कोपरगावात मुस्लिम समाजाचे उपोषण, धर्मग्रंथाची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करण्याची मागणी
By सचिन धर्मापुरीकर | Published: August 22, 2023 04:03 PM2023-08-22T16:03:01+5:302023-08-22T16:03:33+5:30
कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथील मशिदीत गुरुवार दि.१० ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने घुसून आतील पवित्र धर्मग्रंथ फाडले होते.
कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील कोळगाव थडी येथे धार्मिक ग्रंथाची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करावी, खोटे आरोप करून धुडगूस घालणाऱ्यांवर कारवाई करावी, भडकाऊ भाषण करून धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, या व इतर मागण्यांसाठी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवारपासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथील मशिदीत गुरुवार दि.१० ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने घुसून आतील पवित्र धर्मग्रंथ फाडले होते. हा प्रकार दि. ११ रोजी निदर्शनास आल्यानंतर कोळगावथडी येथे जमाव जमला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आदींनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन केले. त्याचदिवशी दुपारी कोळगावथडी येथील घटनेचे पडसाद कोपरगाव शहरात उमटले.
असंख्य नागरिक कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात जमले. तिथे आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. घटनेला आठ दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपीला अटक न झाल्याने शुक्रवार (दि. १८ ऑगस्ट रोजी) समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने कोपरगाव तहसील समोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवार दि. २२ ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर मुस्लिम समाजाच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे.
उपोषण स्थळी घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच समाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या उपद्रवींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या उपोषणाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला. आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना देण्यात आले. उपोषणकर्त्यांमध्ये फिरोज पठाण, अकबर शेख, अय्याज कुरेशी, शरफुद्दीन सय्यद, अजिज शेख, नवाज कुरेशी, अन्सार शेख, वसीम चोपदार, जावेद शेख, अमजद शेख, इरफान शेख, तौसीफ मणियार, इम्रान शेख, फिरोज पठाण, इरफान कुरेशी, असलम शेख, नदीम अत्तार, जुनेद खाटीक, नदीम शेख आदींचा समावेश आहे.