मुलीच्या हृदयासाठी मजूर पित्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:31 AM2019-05-05T11:31:24+5:302019-05-05T11:31:31+5:30
श्रीगोंदा शहरातील औटीवाडी येथील रामदास हौसराव औटी यांची मुलगी रूपाली हिला हृदय व फुफ्फुसातील संसर्ग झाल्याने ती मृत्युशी झुंज देत आहे.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील औटीवाडी येथील रामदास हौसराव औटी यांची मुलगी रूपाली हिला हृदय व फुफ्फुसातील संसर्ग झाल्याने ती मृत्युशी झुंज देत आहे. तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी ३० लाखांचा खर्च डॉक्टरांनी सांगितला आहे. घरची परिस्थिती नाजूक असल्याने हे पैसे उभे करण्यासाठी माता पित्याची भटकंती सुरू आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील एका सहकारी साखर कारखान्यात रामदास औटी मजुरी करीत होते. गेल्यावर्षी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना एक मुलगा, तीन मुली आहेत. दोन मुली व मुलाचा विवाह करून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. मात्र दहावी शिकलेली शेवटची व धाकटी मुलगी रूपाली (वय २५) हिच्या विवाहाचे स्वप्न बघतानाच तिला आजाराने ग्रासले.
वयाच्या सहाव्या वर्षी रूपालीच्या हृदयाला बारीक छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी तिला पुण्यातील नामांकित रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी औषधांचा कोर्स केल्यास पुढे काही त्रास होणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार रोज गोळ्या व औषधोपचार सुरू आहे.
दानशूरांकडून हवा तिला मदतीचा हात
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तिला थकवा, चक्कर व दम लागणे अशी लक्षणे दिसू लागली. त्यावर घरच्यांनी तिला मुंबईच्या रूग्णालयात दाखल केले. तपासणी केली असता रूपालीचे हृदय व फुफ्फुसे तत्काळ बदलावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले.
यासाठी ३० लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. पोटच्या गोळ्याचा जीव वाचविण्यासाठी वडील रामदास व आई सुशिला हे सैरभैर भटकंती करीत आहेत. त्यासाठी सामाजिक संस्था तसेच दानशूरांनी तिला मदतीचा हात देण्याची गरज आहे.