मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या चिंतेने पित्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 10:33 AM2019-02-14T10:33:34+5:302019-02-14T10:41:02+5:30
मुलीचे लग्न जमले, सुपारी फुटली, मात्र लग्नाचा खर्च कसा करायचा या विवंचनेत असलेल्या मुलीच्या वडिलांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जामखेड येथे घडली.
जामखेड - मुलीचे लग्न जमले, सुपारी फुटली, मात्र लग्नाचा खर्च कसा करायचा या विवंचनेत असलेल्या मुलीच्या वडिलांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जामखेड येथे घडली. दरम्यान एकाच महिन्यात तालुक्यात चार आत्महत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वैरवनाथ नवनाथ राक्षे ( ४६ ) रा. धोंडपारगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
वैरवनाथ राक्षे हे शेतीसाठी लाकडी अवजारे बनवायचा व्यवसाय करत होते. मात्र अलीकडे बदलत्या काळानुसार या व्यवसायात बदल होऊन लोखंडी अवजारे निघाले. त्यामुळे राक्षे यांचा लाकडी अवजारे बनवण्याचा व्यवसाय अडचणीत आला होता. त्यातच मुलीचे लग्न देखील जमले होते व दोनच दिवसांपूर्वी मुलीच्या लग्नाची सुपारी देखील फुटली होती. मात्र तेव्हापासून ते मुलीच्या लग्नाच्या विवंचनेत होते. शनिवारी सकाळी ते घरातून कोणालाही न सांगता घराबाहेर पडले तेव्हापासून घरातील लोक त्यांचा शोध घेत होते. मात्र दिवसभरात त्यांचा तपास न लागल्याने जामखेड पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
चार दिवसांनी त्यांचा मृतदेह गावापासूनच जवळ बावी गावच्या शिवारात प्रकाश चोखा साळवे यांच्या शेतातील गट नं ६३ मध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला. तसेच जवळच विषारी औषध प्राशन केलेली बाटलीही आढळली. या नंतर धोंडपारगावचे पोलीस पाटील रामचंद्र नामदेव शिंदे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला खबर दिली व पोलीसांनी पंचनामा केला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. घटनास्थळी साहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चव्हाण व पोलीस कॉ. गहिनीनाथ यादव हे करत आहेत.