मिठाईवर एफडीएची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:18 AM2018-09-12T11:18:22+5:302018-09-12T11:19:15+5:30
गणेशोत्सव काळात महाप्रसाद व मिठाईमध्ये भेसळ होऊ नये यासाठी अन्न, औषध प्रशासनाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अहमदनगर : गणेशोत्सव काळात महाप्रसाद व मिठाईमध्ये भेसळ होऊ नये यासाठी अन्न, औषध प्रशासनाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. गणेश मंडळांच्यावतीने तयार करण्यात येणारा महाप्रसाद व मिठाई दुकानदारांची तपासणी करण्यात येणार आहे़ या ठिकाणी अन्नात भेसळ आढळून आली तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त बालू ठाकूर यांनी सांगितले.
गणेशोत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते तर दुकानांमधूनही मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी केली जाते़ या काळात मिठाईला मागणी वाढत असल्याने त्यात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ यातून विषबाधा होण्याची शक्यता असते़ अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी अन्न शिजविणे, अन्नाचे वाटप करणे अथवा अन्नाची विक्री करणे, यासाठी एफडीएची नोंदणी आणि परवाना बंधनकारक आहे. अगदी धार्मिक कार्यासाठी अन्न शिजविण्यासाठी किंवा कुठल्याही धार्मिक सणाच्या वेळेस महाप्रसाद तयार करण्यासाठी व त्याचे वाटप करण्यासाठीही एफडीएकडून परवाना घेणे बंधनकारक आहे़ अशी नोंदणी नसेल, तर एफडीएला कारवाई करण्याचा अधिकार आहे. विषबाधा होऊ नये आणि स्वच्छ सुरक्षित अन्नप्रसाद-महाप्रसाद म्हणून भक्तांना दिला जावा, हा यामागचा उद्देश आहे. अन्न, औषध प्रशासनाकडून सर्व गणेश मंडळांना व विक्रीसाठी अन्न तयार करणाऱ्या दुकानदारांना नोंदणी व परवाना घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ अद्याप एकाही गणेश मंडळाने महाप्रसाद तयार करण्यासाठी परवानगी मागितलेली नाही, असे एफडीएकडून सांगण्यात आले़
दुकानांचे परवाने तपासणार
गणेशोत्सव काळात अनेक दुकानदार मिठाई तयार करून विक्री करतात़ शहारातील सर्वच दुकानदारांची तपासणी करून अन्नाचे नमूने घेण्यात येणार आहे़ ज्या ठिकाणी भेसळ आढळेल तसेच ज्यांच्याकडे परवाना नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे़
मंडळाच्या पदाधिका-यांची बैठक घेणार
४गणेशोत्सवकाळात महाप्रसाद तयार करताना घ्यावयाची काळजी, नोंदणी, परवाना याबाबत माहिती सांगण्यासाठी अन्न, औषध प्रशासनातील अधिकारी शहरातील व जिल्ह्यातील विविध ठिकाणाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची बैठक घेणार आहेत़
गणेशोत्सव काळात गोड पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात़ या काळात अन्नातून विषबाधेसारखा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे़ अन्न, औषध प्रशासनातील अधिकाºयांनी दुकानांची तपासणी सुरू आहे़ गणेश मंडळातील पदाधिकाºयांच्या बैठका घेण्यात येणार आहे.- बालू ठाकूर, सहाय्यक आयुक्त, अन्न, औषध प्रशासन