कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला : लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 07:00 PM2021-05-18T19:00:13+5:302021-05-18T19:05:32+5:30
कडाक्याचे ऊन असले तरी आधीच कडक निर्बंधामुळे नागरिक घरीच असल्याने उन्हापासून दूरच आहेत. कोरोनाच्या भीतीने यंदा कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पळाला असेच जिल्ह्यात चित्र आहे.
अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये विविध आजारांचे रुग्ण एकतर घरीच बसलेले आहेत किंवा रुग्णालयात दाखल आहेत. कडाक्याचे ऊन असले तरी आधीच कडक निर्बंधामुळे नागरिक घरीच असल्याने उन्हापासून दूरच आहेत. कोरोनाच्या भीतीने यंदा कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पळाला असेच जिल्ह्यात चित्र आहे.
विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या आधीच कमी झाली आहे. मात्र काही जणांना ऊन लागले, उन्हाचा त्रास झाला तरीही रुग्णांनी दवाखान्यात न जाता घरीच उपचार घेतले आहेत. शिवाय जिल्हा रुग्णालयात सर्वच रुग्ण कोरोनाचे असल्याने दरवर्षी असणारा उष्माघात कक्ष यंदा मात्र दिसून आला नाही.
जिल्ह्यात एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान तापमान साधारणपणे ३८ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. यंदाही तापमानाने चाळिशी ओलांडली, मात्र त्याची तीव्रता जाणवली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मार्चमध्येच उष्माघात कक्ष तयार करण्यात येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा रुग्ण आल्यास कसे उपचार करावे, याबाबत दरवर्षी सूचना देऊन त्यांना प्रशिक्षणही दिले जाते. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कडाक्याच्या उन्हातही उष्माघात कक्ष उभारण्यात आल्याचे दिसून आले नाही. मागील वर्षी तापमानही ४२.५ अंश सेल्सिअसच्या वर गेलेले होते.
अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या औरंगाबाद, नाशिक, पुणे जिल्ह्यातही तापमानाचा पारा 40 च्या वर होता.
ऊन वाढले तरी....
जिल्ह्यात एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. साधारणत: ४० अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान गेले होते. मात्र त्यावेळेसही उष्माघात कक्ष उभारण्याविषयी नियोजन झाले नाही. यंदा एप्रिल हीटही तसा जाणवला, मात्र कोरोनापुढे सर्व आजार आता थंड पडले आहेत.
उन्हाळा घरातच.....
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढलेला असल्याने इतर काही छोटे आजार घरगुती उपचाराने बरे करण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. ऊन लागल्यानंतरही अनेकजण घरगुती उपचारावर भर देत आहेत. ऊन लागल्यास गूळ खाणे, शेळी किंवा गाईचे दूध अंगाला, तळपायाला लावणे, कांद्याचा रस डोक्याला लावणे असे काही घरगुती उपचार केले जातात.
दरवर्षी प्रत्येक आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष असतो. तिथे रुग्ण आल्यास तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात येते. यावर्षी उष्माघाताचा एकही रुग्ण आला नाही.
-डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर