कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीतीने राज्यात रोजगार हमीवरील मजुरांची संख्या घटली
By सुदाम देशमुख | Published: November 29, 2020 12:18 PM2020-11-29T12:18:12+5:302020-11-29T12:20:12+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या नोव्हेंबरमध्ये घटली आहे. दिवाळीसाठी घरी गेलेल्यांपैकी निम्मे मजूर पुन्हा कामावर आलेच नाहीत. थंडीचे दिवस, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने मजुरांनी कामाकडे पाठ फिरवली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३ ते ४ हजार मजूर कमी झाल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या नोव्हेंबरमध्ये घटली आहे. दिवाळीसाठी घरी गेलेल्यांपैकी निम्मे मजूर पुन्हा कामावर आलेच नाहीत. थंडीचे दिवस, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने मजुरांनी कामाकडे पाठ फिरवली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३ ते ४ हजार मजूर कमी झाल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी कुटुंबांची नोंदणी केली जाते. यावर्षी ९५ लाख जॉबकार्ड वाटप करण्यात आले होते. मात्र, ऐन मार्चा-एप्रिलमध्येच यंदा कोरोना महामारीचे संकट आले. त्यामुळे नोंदणी केलेल्यांपैकी ३० लाख ९२ हजार एवढेच जॉबकार्ड ॲक्टिव्ह राहिलेले आहेत. या कार्डानुसार २ कोटी २७ लाख ४३ हजार मजुरांनी कामासाठी नोंदणी केली होती. त्यात फक्त ५९ लाख १६ हजार मजूर प्रत्यक्ष कामावर होते. नोंदणी केलेल्या मजुरांपैकी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांचे हे प्रमाण १३.५९ टक्के इतके राहिलेले आहे, असे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.
यंदा मार्च-एप्रिल-मेमध्ये कोरोनामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन होता. मजुरांना स्थानिक परिसरात काम देण्यात येते. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांवर सरासरी तीन लाख कुटुबांनी कामावर हजेरी लावली. जूननंतर पावसाळा सुरू झाल्याने तसेच कामे कमी झाल्याने मजुरांची संख्या निम्म्यावर आली. जुलै ते ऑक्टोबरपर्यंतच्या सरासरीपेक्षा नोव्हेंबरमधील मजुरांची उपस्थिती निम्म्यावर आली आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक मजूर दिवाळी सणामुळे कामावर आलेच नाहीत.
दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारणामुळे मजुरांची पुन्हा कामावर येण्याची मानसिकता नसल्याचे चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ७ हजार कुटुंब कामावर होते. ही संख्या ४ हजारांपर्यंत कमी झाली आहे. राज्यातही अशीच परिस्थिती असल्याचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे केंद्र सरकारतर्फे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत धान्याचे मोफत वाटप झाले. त्याचाही फटका रोजगार हमी योजनेला बसला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्याची स्थिती पाहता नोव्हेंबमध्ये मजूर कुटुंबांची संख्या निम्म्यापर्यंत कमी झाली आहे. सध्या कामावर असलेल्या कुटुंबांमध्ये औरंगाबाद (१७८७५), नंदुरबार (७१७०), नागपूर (९६०२) या तीन जिल्ह्यात सर्वाधिक कुटुंब कामावर आहेत. तर अहमदह्र जिल्ह्यात (६३२२) कुटुंब काम करीत आहेत.
रोजगार हमी योजनेची स्थिती
एकूण जॉबकार्ड वाटप- ९५ लाख ८९ हजार
ॲक्टिव्ह जॉबकार्ड- ३० लाख ९२ हजार
मजुरांची नोंदणी- २ कोटी २७ लाख ४३ हजार
ॲक्टिव्ह मजूर- ५९ लाख १६ लाख
रोजगार हमीवरील कुटुंबसंख्या (२०२०)
एप्रिल १,९८,७०१
मे ६,८९,६३७
जून ५,५२,५७२
जुलै ३, ०२,०६४
ऑगस्ट २.०६,२०३
सप्टेंबर २,२९,९३७
ऑक्टोबर २,२८,३६१
नोव्हेंबर १,३३,२१७