अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:24 AM2021-09-22T04:24:58+5:302021-09-22T04:24:58+5:30

संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू होईल की काय, अशी भीती आता वाटते आहे. जिल्ह्यात आज ...

Fear of a third wave of corona in the state from Ahmednagar district | अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती

अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती

संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू होईल की काय, अशी भीती आता वाटते आहे. जिल्ह्यात आज पाच हजारपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसून येते, असे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त गमे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (दि. २१) त्यांनी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय आणि तालुक्यातील निमोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

आराेग्य विभागाचे उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, संगमनेर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, नोडल ऑफिसर डॉ. सीमा घोगरे आदी यावेळी उपस्थित होते.

गमे म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. लोकांनी जी शिस्त पाळायला हवी, ती पाळली जात नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली असूनही आठवडे बाजार अनेक ठिकाणी सुरू असल्याचे निर्देशनास आले. दुकानदार, ग्राहक मास्क वापरताना दिसत नाही. हॉटेल्समध्ये गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात येणे फार मुश्कील बाब आहे. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या सर्व बाबींकडे लक्ष द्यायला आणि कारवाई करायला त्यांना सांगितले आहे.

कोरोना टेस्ट वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात सध्या १६ हजार टेस्ट होतात. त्या २५ हजारपेक्षा अधिक कराव्यात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सध्या दहाच्या आसपास आहे. एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीच्या संपर्कातील दहा व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होते. त्यात वाढ करून तीसपर्यंत करावे, असेही सांगितले आहे.

सरकार उपाययोजना करेल; परंतु लोकांचे सहकार्य मिळणेदेखील आवश्यक आहे. कान्हूर पठार, पारनेर भागात गेलो. तेथे सांगत होते की, दशक्रिया, तेरावा विधीसाठी हजार-हजार तसेच लग्नासाठी दोन-दोन हजार लोक एकत्र येत आहेत. लग्नाच्या वराती होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. या जिल्ह्यातून राज्यात तिसरी लाट सुरू झाली, असा कुठलाही दोष जिल्ह्यावर येऊ नये यासाठी तरी सर्वांनी काळजी घ्यावी.

- राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त

Web Title: Fear of a third wave of corona in the state from Ahmednagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.