रोडरोमिओंच्या टोळक्यांवर ‘निर्भया’ची नजर; तीन वर्षांत अडीच हजार जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:50+5:302021-09-16T04:27:50+5:30
----------- अहमदनगर : शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासेस परिसरात तसेच रस्त्यावर मुलींच्या आसपास वावरणारे व छेड काढणाऱ्या २ हजार ...
-----------
अहमदनगर : शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासेस परिसरात तसेच रस्त्यावर मुलींच्या आसपास वावरणारे व छेड काढणाऱ्या २ हजार ५७२ रोडरोमिओंवर गेल्या तीन वर्षांत निर्भया पथकाने कारवाई करत त्यांना कायद्याचा धाक दाखविला आहे. मुलींना त्रास देणाऱ्या अशा टुकारांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी मुली व पालकांमधून होत आहे.
कोरोनामुळे शाळा, विद्यालये व खासगी क्लासेस बंद असल्याने गेल्या काही दिवसांत मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण कमी झाले असले तरी एकटी मुलगी पाहून छेडछाडीच्या घटना सुरूच आहेत. मुलींजवळ जाऊन जोराने मोटारसायकलीचा हॉर्न वाजविणे, शिट्या मारणे तर कधी थेट हात पकडून प्रेमाची मागणी करणे आदी प्रकार घडतात. शाळा, विद्यालये सुरू होताच मुलींना छेडछाडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थिनी आणि पालकांमधून होत आहे.
----------------------
कोणी छेड काढत असेल तर येथे संपर्क करा
नगर शहर व परिसरात कुणी मुलींची छेड काढत असेल तर निर्भया पथकाच्या १०९१ अथवा ९३७०९०३१४३ या क्रमांकावर संपर्क करावा. गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे भरोसा सेलच्या उपनिरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांनी सांगितले.
----------------------
अशी होते निर्भया पथकाकडून कारवाई
मुलींना सुरक्षा देण्यासाठी निर्भया पथक कार्यरत आहे. हे पथक दिवसभर शाळा, विद्यालये, उद्याने तसेच शहरात विविध ठिकाणी गस्त घालते. या दरम्यान कुणी मुलींची छेड काढताना आढळून आला अथवा एखाद्या मुलीने तक्रार केली तर सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जाते. मुलींना त्रास देणाऱ्या मुलांच्या माता-पित्यांनाही सेलमध्ये बोलावून समज दिली जाते. घटना गंभीर असेल तर गुन्हाही दाखल केला जातो.
-----------------------
मुलींना सुरक्षा देण्यासाठी निर्भया पथक कार्यरत आहे. या पथकाच्या माध्यमातून शाळा, विद्यालयांमध्ये जाऊन मुलींशी संवाद साधला जातो. त्यांना कुणी त्रास देत असेल तर तत्काळ कारवाई केली जाते. कोरोनाकाळात विद्यार्थिनी व शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधण्याचा उपक्रम सुरू आहे. तसेच नगर शहरातील ६५ शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्यात आलेल्या आहेत. मुलींनी या पेटीत तक्रारी केल्या तरी कारवाई केली जाते.
- पल्लवी उंबरहंडे, पोलीस उपनिरिक्षक भरोसा सेल
फोटो- १५ निर्भया १, २