कोरोना सेंटरमधील डान्स भावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:24+5:302021-05-30T04:18:24+5:30
अहमदनगर : कोरोना सेंटरमध्ये काही जण वेगवेगळ्या प्रकारच्या डान्सचा आस्वाद घेत आहे. ही नवीन पद्धत मला आज भावली आहे, ...
अहमदनगर : कोरोना सेंटरमध्ये काही जण वेगवेगळ्या प्रकारच्या डान्सचा आस्वाद घेत आहे. ही नवीन पद्धत मला आज भावली आहे, असा टोला खासदार सुजय विखे यांनी लगावला. कर्जत तालुक्यातील एका कोविड सेंटरमध्ये आमदार रोहित पवार यांनी चार-पाच दिवसांपूर्वी डान्स केला होता. पार्श्वभूमीवर विखे यांनी कोणाचेही नाव न घेता ही टीका केली.
महापालिकेत शनिवारी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. विखे म्हणाले, राज्यात आमचे संख्याबळ नाही. तशीच अवस्था नगरच्या महानगरपालिकेमध्ये आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आम्ही कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. गेल्या वेळेस राष्ट्रवादीचे सहाय्य आम्ही घेतले, तेव्हा राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात नव्हती. महानगरपालिकेमध्ये महापौरपदासाठी भाजपकडे उमेदवारही नाही. त्यामुळे आम्ही दावा करण्याचे काहीच कारण नाही. आता राज्यातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आलेले आहे. मुख्यमंत्री होताना त्यांनी जसा निकष लावला होता, तसाच निकष ते इथे सुद्धा लावतील, अशी अपेक्षा आहे, विखे यांनी व्यक्त केली.
लसीकरण मोहीम सगळ्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे, असे प्रशासनाला सांगितले आहे. शुक्रवारी शहरातील लसीकरण केंद्रांची यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये आता नव्याने बदल करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आता प्रत्येक प्रभागांमध्ये मंगल कार्यालय निश्चित करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी उपकेंद्र तत्काळ सुरू केले जातील. लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना तत्काळ दिली जाईल, असेही विखे म्हणाले.
--