महिलेची रस्त्यातच प्रसूती; वारी आरोग्य केंद्राला कुलुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:41 PM2019-09-08T12:41:42+5:302019-09-08T12:42:42+5:30
वारी येथील एका महिलेला शुक्रवारी दुपारी प्रसूतीच्या वेदना सुरु असतानाच जवळचा पर्याय म्हणून वारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र या केंद्राला कुलुप असल्याने पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जावे लागले. या प्रवासातच रस्त्यात शिंगवे येथे वाहनाताच या महिलेची प्रसूती झाली.
रोहित टेके
कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील एका महिलेला शुक्रवारी दुपारी प्रसूतीच्या वेदना सुरु असतानाच जवळचा पर्याय म्हणून वारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र या केंद्राला कुलुप असल्याने पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जावे लागले. या प्रवासातच रस्त्यात शिंगवे येथे वाहनाताच या महिलेची प्रसूती झाली.
वारीतील अर्चना अण्णासाहेब काचोरे या गरोदर महिलेची प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरवातीलाच नाव नोंदणी केली गेली. सर्व तपासण्या व कागदपत्रांची पूर्तता झाली होती. अर्चना यांना शुक्रवारी दुपारी अचानक प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्यानंतर फोनवरून संपर्क साधला. मात्र येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने दुसरीकडे घेऊन जा, असा सल्ला देण्यात आला. त्यानंतरही वारीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र आरोग्य केंद्राला कुलुप असल्याचे दिसून आले. त्यानंतर दरम्यान महिलेला पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे ठरले. परंतु घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेचा चालक उपलब्ध नसल्याने महिलेला खासगी वाहनाने घेऊन जातांनाी शिंगवे गावात वाहनातच प्रसूती झाली. महिला व बाळ दोघेही सुखरूप आहेत.
वारीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. या घटनेमुळे नातेवाईकासह ग्रामस्थामधून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
माझ्या गरोदर मुलीला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने तेथील परिचारिकेशी फोन वरून संपर्क केला. आज सुटी असल्याने डॉक्टर नाहीत. त्यामुळे प्रसूतीसाठी दुसरीकडे घेऊन जा असे सांगितले. दरम्यान माझा मुलगा दवाखान्यात गेला असता तेथे कुलूप लावलेले होते, असे महिलेचे वडील कैलास इथापे यांनी सांगितले.
वारी आरोग्य केंद्राचा प्रभारी पदभार आहे. माझी पूर्णवेळ संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती आहे. शुक्रवारी संवत्सर येथे रुग्ण तपासणीसाठी गेले होतो. वारी केंद्रातील माझे सहकारी डॉ. संकेत गायकवाड हे दुपारी १ वाजेपर्यंत हजर होते. त्या नंतर ते जेवायला गेले. शुक्रवारी दुपारनंतर अर्धा दिवस व शनिवारी पूर्ण दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रास सुटी असते, असे केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पारखे यांनी सांगितले.
..
चौकशी करून दोषींवर कारवाई करणार
वारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संबंधित वैद्यकीय अधिकाºयांना तसेच कर्मचाºयांना पूर्णवेळ तेथेच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. एखाद्या महिलेच्या प्रसूती संदर्भात काही समस्या निर्माण झाल्यास त्यांना तत्काळ पुढील योग्य त्या उपचारासाठी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून प्रसंगी स्वत: बरोबर जाऊन सोडविण्याच्या कडक सूचना दिलेल्या आहेत. महिलेच्या प्रसूती दरम्यान झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून यात जे कोणी दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी सांगितले.