पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:38 PM2019-08-31T12:38:00+5:302019-08-31T12:38:05+5:30
एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने महिला जागीच ठार झाली. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे आज पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली.
निघोज : एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने महिला जागीच ठार झाली. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे आज पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. राधाबाई कारभारी वाजे (वय ७०) असे या महिलेचे नाव असून या घटनेने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राधाबाई कारभारी वाजे या पहाटे घरामागील डाळिंबाच्या बागेत प्रात:विधीसाठी गेल्या होत्या. त्याच वेळी बिबट्याने त्यांच्यावर झडप घालून घरापासून दूर ओढत नेले. या हल्ल्यात त्या मृत्यूमुखी पडल्या. घटनेची माहीती समजताच पोलिस प्रशासन व वनविभागाचे आधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्याला जेरबंद करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. बिबट्याचा वावर वाढला असल्याने येथील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पारनेरचे पोलिसनिरीक्षक बाजीराव पोवार, तहसिलदार प्रविण चव्हाणके, निलेश लंके, वनपरिमंडळ एस.एस.साळवे, यु.पी. खराडे, वनअधिकारी रंगनाथ वाघमारे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. सरपंच रेखाताई येवले, उपसरपंच गणेश सुकाळे, स्वराज्य युवा मंचाचे अध्यक्ष गणेश शेटे, सुनिल बाबर, माजी उपसरपंच रमेश वाजे, पांडुरंग येवले, अनिल नर्हे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष कारभारी बबर हे आक्रमक ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न करीत आहे.