साईसंस्थानवर निवडीसाठी फिल्डिंग; इच्छुक व स्पर्धाही वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 08:20 AM2023-07-10T08:20:18+5:302023-07-10T08:20:45+5:30
अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्या पदाधिकाऱ्यांना साई संस्थानमध्ये विश्वस्त पदांसाठी सामावून घेण्यासाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळण्याचीही शक्यता आहे
प्रमोद आहेर
शिर्डी (जि. अहमदनगर) : इच्छुक जास्त व मंत्रिपदे मर्यादित असल्याने नाराजी कमी करण्यासाठी विद्यमान सत्ताधाऱ्यांना महामंडळे व शिर्डीसारख्या देवस्थानांचा आधार घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीची प्रतीक्षाही संपण्याची चिन्हे आहेत.
अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्या पदाधिकाऱ्यांना साई संस्थानमध्ये विश्वस्त पदांसाठी सामावून घेण्यासाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळण्याचीही शक्यता आहे. अगोदर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सतरा जागांसाठी जवळपास पाचशे अर्ज म्हणजे एका जागेसाठी अंदाजे तीस जण इच्छुक आहेत. आता राष्ट्रवादीचे आणखी अर्ज वाढून हा आकडा चाळिशीपार जाण्याची शक्यता आहे. निवडीतील स्पर्धेमुळे सरकारची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सुरेश हावरे यांच्या व्यवस्थापनापूर्वी चार वर्षे व नंतर आमदार आशुतोष काळे यांचा अल्प कार्यकाळ वगळता बहुतेक वेळ संस्थानचा कारभार जिल्हा प्रधान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तदर्थ समिती बघत आहे. सध्याही तदर्थ समितीच कामकाज पाहत आहे. गेल्या दहा वर्षांत राज्यकर्त्यांना संस्थानवर पूर्ण क्षमतेचे व्यवस्थापन नेमता आलेले नाही.