मोबाइल टॉवर कंपन्यांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:22 AM2021-02-16T04:22:24+5:302021-02-16T04:22:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्यातील मोबाइल कंपन्यांना टॉवर सेवा पुरविणाऱ्या एटीसी व इंडस कंपनीने गेल्या वर्षभरात सातशे कामगारांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : राज्यातील मोबाइल कंपन्यांना टॉवर सेवा पुरविणाऱ्या एटीसी व इंडस कंपनीने गेल्या वर्षभरात सातशे कामगारांना कामावरून काढून टाकले असून, त्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा मोबाइल टॉवर टेक्निकल असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिला.
मोबाइल टॉवर असोसिएशनच्या वतीने कायदेशीर सल्लागार ॲड.श्रीरंग गिते यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, जून, २०२० ते जानेवारी, २०२१ या काळात मोबाइल कंपन्यांना टॉवर सेवा पुरविणाऱ्या एटीसी व इंडस कंपनीने सुमारे ७०० कामगारांना काढून टाकले आहे. कामगारांना थेट काढून न टाकता पगार थकविणे, इतर ठिकाणी बदली करणे, काहींचे दमदाटी करून राजीनामे घेणे, असे प्रकार सुरू आहेत. कामगार कायद्यानुसार कामगारांना कामावरून काढून टाकताना रीतसर एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. त्यानंतर, त्याच्या सेवेनुसार त्यांना मोबदला दिला जातो. याबाबत कंपन्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व सेवा ठप्प होत्या, परंतु मोबाइल सेवा नियमित सुरू होती. ही सेवा सुरू राहावी, यासाठी कामगारांनी चोवीस तास काम केले. लॉकडाऊनच्या काळात टॉवर कंपन्यांनीही कामगारांना दुखविले नाही, परंतु लॉकडाऊनंतर मात्र कामगारांना काढून टाकण्याचा सपटाच लावला आहे. कंपन्यांनी अहमदनगरसह जालना, औरंगाबाद, नागपूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे आदी जिल्ह्यातील कामगारांना काढून टाकले असून, कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात मोबाइल टॉवर असोसिएशन काम करत आहेत. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी असोसिएशनने मुख्यमंत्र्यांसह कामगार विभाग व संबंधित कंपन्यांना याबाबत पत्र पाठविले आहे. टॉवर कंपन्यांनी येत्या पंधरा दिवसांत कामगारांना काढून टाकण्याची प्रक्रिया थांबवावी, अन्यथा राज्यातील सर्व जिल्ह्यातील कामगारांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
....
मोबाइल टॉवर कंपन्यांकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात राज्य मोबाइल टॉवर असोसिएशनच्या वतीने आंदोलन उभे करण्यात येत आहे. कामगार वैयक्तिकरीत्या कंपन्यांविरोधात आवाज उठवू शकत नाहीत. त्यामुळे ज्या कामगारांवर अन्याय झाला आहे, अशा कामगारांनी असोसिएशनशी संपर्क करावा.
- सदाशिव खेडकर, अध्यक्ष, महारष्ट्र राज्य मोबाइल टॉवर टेक्निकल असोसिएशन