उन्नावमध्ये अडकले नवोदयचे पंधरा विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 12:15 PM2020-05-03T12:15:38+5:302020-05-03T12:16:19+5:30
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील नववीचे १५ विद्यार्थी उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये अडकले आहेत. तसेच उन्नावमधील १५ विद्यार्थीही टाकळी ढोकेश्वरमध्ये अडकले आहेत.
विनोद गोळे ।
पारनेर : उत्तरप्रदेश सरकारने दोन वेळा परवानगी देऊनही नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व नगर जिल्हा प्रशासनातील समन्वयाअभावी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील नववीचे १५ विद्यार्थी उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये अडकले आहेत. तसेच उन्नावमधील १५ विद्यार्थीही टाकळी ढोकेश्वरमध्ये अडकले आहेत.
टाकळी ढोकेश्वर येथे केंद्र शासनाचे जवाहर नवोदय विद्यालय आहे. नववीचे विद्यार्थी मागील वर्षी एक वर्षाच्या अंतर्गत आदान-प्रदान अभ्यास कार्यक्रमासाठी उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथे व तेथील विद्यार्थी टाकळी ढोकेश्वरमध्ये आहेत. एप्रिलमध्ये ते परत येणार होते. मात्र देशभर कोरोनामुळे संचारबंदी असल्याने ते अडकून पडले आहेत. पारनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यातील पालकांनी याची माहिती आमदार निलेश लंके यांना दिली. नंतर लंके यांनी माहिती घेतल्यावर जिल्हा प्रशासन आणि प्राचार्य यांच्यातील असमन्वयाचा प्रकार समोर आला आहे.
उन्नावमधील टाकळी ढोकेश्वर येथील विद्यार्थ्यांची तपासणी करून सोडण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने दोनदा परवानगी दिली. मात्र टाकळी ढोकेश्वर येथे उत्तरप्रदेशच्या अडकलेले १५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांकडे याचा प्रस्तावच गेला नाही. त्यामुळे दोन्हीकडचे विद्यार्थी अडकून पडले आहेत.
जवाहर नवोदय विद्यालयात उन्नावच्या अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे डॉक्टर सेल प्रमुख डॉ. बाळासाहेब कावरे यांना सूचना केल्या. त्यानंतर डॉ. कावरे यांनी शासकीय वैद्यकीय अधिकाºयामार्फत विद्यार्थ्यांची तपासणी करून अहवाल प्राचार्यांना दिला आहे.
आमदार निलेश लंके यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याबरोबर चर्चा करून टाकळी ढोकेश्वरमधील उन्नावच्या विद्यार्थ्यांना उत्तरप्रदेशमध्ये जाणण्यासाठी परवानगी मिळवून दिली. तसेच त्यांना घेऊन जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून दिली आहे, असे पारनेर तालुका राष्टÑवादी सेलचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब कावरे यांनी सांगितले.