पंधरा वर्षांनंतर निराधार आजोबांच्या डोळ्यांना मिळाली दृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:30 AM2021-02-23T04:30:56+5:302021-02-23T04:30:56+5:30
कोपरगाव : शहरातील कापड बाजार येथील ८५ वर्षीय सुधाकर वखारे (गुरुजी) या निराधार आजोबांची मागील पंधरा वर्षांपासून एका ...
कोपरगाव : शहरातील कापड बाजार येथील ८५ वर्षीय सुधाकर वखारे (गुरुजी) या निराधार आजोबांची मागील पंधरा वर्षांपासून एका डोळ्याची दृष्टी पूर्णतः गेली होती तर एका डोळ्याने फक्त दहा टक्केच दिसत होते. त्यामुळे सामाजिक दायित्व म्हणून कोपरगाव शहर शिवसेनेच्यावतीने शिवजयंतीनिमित वखारे यांच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून वखारे यांना पुन्हा दृष्टी देण्याचे काम शिवसेनेने केले आहे.
सुधाकर वखारे यांनी कोपरगाव तालुक्यातील एका साखर कारखान्यात काही वर्ष नोकरी केली. त्यानंतर शहरात घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचे कामही केले. परंतु, गेल्या १५ वर्षांपासून मोतीबिंदूमुळे ते पूर्णतः नेत्रहीन झाले होते. त्यातच ते निराधार असल्याने त्यांना चरितार्थ चालवणे कठीण झाले होते. परंतु, लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांच्या परिस्थितीविषयी चर्चा झाली. त्यावर अनेकांनी त्यांना मदतही केली तसेच त्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. त्यानुसार शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी रुग्णालयामध्ये डॉ. तेजश्री अमित नाईकवाडे, डॉ. प्रशांत सलगिले यांनी ही अवघड अशी नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी करून वखारे यांना दृष्टी प्रदान करत त्यांच्या जीवनात नवीन प्रकाश फुलवला आहे. यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल यांनी रुग्णालयाचा खर्च केला तर एस. टी. कामगार सेनेचे प्रमुख भरत मोरे यांनी सर्व औषधांचा खर्च केला. संत जनार्दन स्वामी रुग्णालयाचे चांगदेव कातकडे, डॉ. प्रसाद कातकडे, कुकुशेठ सहानी, चेतन खुबाणी यांनीही या अभिनव कार्यासाठी मदत केली.
..........
शिवसेनेच्यावतीने निराधार वयोवृद्ध सुधाकर वखारे गुरुजींची डोळ्यांची शस्त्रक्रिया करून त्यांना द्रुष्टी मिळाली आहे. त्यामुळे शिवजयंतीनिमित्त शिवरायांना हाच खरा मानाचा मुजरा आहे.
-कलविंदरसिंग दडीयाल, शहराध्यक्ष, शिवसेना कोपरगाव.
.........
पंधरा वर्षानंतर माझ्या डोळ्यांनी मी पुन्हा एकदा बघू शकलो. खूप आनंद होतो आहे. मला पुन्हा द्रुष्टी मिळवूंन देणाऱ्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत...
-सुधाकर वखारे, कोपरगाव.