अकोल्यात स्वाईन फ्ल्यूचा पाचवा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 04:57 PM2018-09-30T16:57:08+5:302018-09-30T16:58:52+5:30
तालुक्यात स्वाईन फ्ल्यूने पाचवा बळी घेतले असून शनिवारी धुमाळवाडी येथील आशा सचिन झोळेकर (वय ८८) या महिलेचा नाशिक येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला.
अकोले / ब्राम्हणी / बोटा : तालुक्यात स्वाईन फ्ल्यूने पाचवा बळी घेतले असून शनिवारी धुमाळवाडी येथील आशा सचिन झोळेकर (वय ८८) या महिलेचा नाशिक येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. यापूर्वी तालुक्यातील समशेरपूर, मोग्रस, तांभोळ, इंदोरी येथील चार रुग्णांचा स्वाईन फ्ल्यूने बळी घेतला आहे. दरम्यान पंचायत समिती आरोग्य विभाग सतर्क झाले असून टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, योग्य पूरक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे यांनी केले आहे. राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात डेंग्यू सदृश आजाराचा रूग्ण आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. गावातील एका डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्णाला नगरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तसेच दोन स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराच्या रुग्णांवरही सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सारोळे पठार (ता. संगमनेर) येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराने नाशिक येथील रूग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. सुरेश बाबूराव फटांगरे, असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सारोळे पठारे येथील सुरेश फटांगरे हे आजारी होते. त्यांना तापही होता. त्यांना संगमनेर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराची लक्षणे दिसून आल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील रूग्णालयात हलविण्यात आले. शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फटांगरे यांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराने झाल्याचे सांगितले. मात्र याबाबतचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. या घटनेनंतर सारोळा पठार तेथे आरोग्य पथक पाठविण्यात आले आहे. ते घरोघरी जाऊन तपासणी करत असल्याचे डॉ. घोलप यांनी सांगितले.
संगमनरमध्ये दीड महिन्यात पाच बळी..
४संगमनेर तालुक्यात गेल्या दीड महिन्यात स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.