लग्नाला व-हाडी पन्नास...बाहेरच थांबले पाहुणे खास; कोरम पूर्ण झाल्याने आई-वडिलांनी बाहेरूनच टाकल्या अक्षदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:43 PM2020-05-27T12:43:38+5:302020-05-27T12:44:33+5:30
५० जणांच्यावर मंगल कार्यालयातही प्रवेश नाकारण्यात येतो आहे. नगर शहरातील एका मंगल कार्यालयात ५० जणांचा कोरम पूर्ण झाल्याने वराचे आई-वडील, काका-काकू यांनाच बाहेर थांबण्याची वेळ ओढावली. शेवटी प्रवेशद्वारातूनच त्यांना वधू-वरांवर अक्षदा टाकाव्या लागल्या.
सुदाम देशमुख ।
अहमदनगर : जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने पन्नास लोकांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात लग्न लावली जात आहेत. वर किंवा वधूपैकी एकाच्याच कुटुंबातील सदस्यांची संख्या ही ५० च्या वर जात असल्याने यजमानांची पंचाईत झाली आहे. ५० जणांच्यावर मंगल कार्यालयातही प्रवेश नाकारण्यात येतो आहे. नगर शहरातील एका मंगल कार्यालयात ५० जणांचा कोरम पूर्ण झाल्याने वराचे आई-वडील, काका-काकू यांनाच बाहेर थांबण्याची वेळ ओढावली. शेवटी प्रवेशद्वारातूनच त्यांना वधू-वरांवर अक्षदा टाकाव्या लागल्या.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे काही चांगल्या, तर काही मजेशीर गोष्टी घडत आहेत. नगर जिल्ह्यात २२ मे पासून लॉकडाऊन शिथिल झाला. ५० जणांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात किंवा घरामध्ये लग्न लावण्याची प्रशासनाने परवानगी दिली. यातही कोविड-१९ च्या अधिनियमांचे पालन करून ही परवानगी देण्यात आली. त्यामुळे दोन महिन्यांपासून मंगल कार्यालयांची बंद असलेली घडी पुन्हा सुरळीत झाली आहे. मात्र पन्नास जणांची अट मंगल कार्यालय मालक, यजमान यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. पन्नास जणांची यादी करणे वधू-वरांच्या पालकांसाठी कठीण गोष्ट बनली आहे.
लग्नासाठी कार्यालयांचे पॅकेज
पन्नास जणांची सोय, चार ते पाच फूट अंतरावर खुर्च्यांची व्यवस्था प्रत्येक मंगल कार्यालयात करण्यात आलेली आहे. मास्क, सॅनिटायझरही मंगल कार्यालयामार्फत दिले जात आहेत. मंगल कार्यालयाच्या भाड्याव्यतिरिक्त पन्नास जणांचे जेवण तयार करून दिले जात आहे. याशिवाय एक भटजी, सनईवाला, अक्षदा, कार्यालयातील सजावट, चहा-पाणी, सरबत, हार-फुले आदी सर्व पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. एरव्ही एक ते दीड लाखापर्यंत मंगल कार्यालयाचे एक दिवसाचे भाडे आकारले जाते. मात्र पन्नास जणांमध्ये लग्न आणि कमी वेळेत, कमी विधी करीत लग्न होत असल्याने २५ ते ३० हजार निव्वळ भाडे आणि जेवणासह असेल तर किमान ५० ते ७५ हजार रुपये भाडे आकारले जात आहे.
सनई, घोडा, वाढपी, केटर्सना विश्रांती
मंगल कार्यालयामधील उपस्थिती ही ५०च्या वर असणार नाही, याची काळजी मंगल कार्यालयांची आहे. तयार जेवण कार्यालयात मागविले जाते. जेवण वाढण्याची जबाबदारीही नातेवाईकांनाच पार पाडावी लागत आहे. संख्या वाढत असल्याने सनई, घोडेवाला, वाजंत्री, बॅण्डपथक, वरात आदींना फाटा देण्यात आला आहे.
लग्नकार्य म्हटले की बारा बलुतेदारांना कामे मिळतात. मात्र पन्नास जणांच्या अटीमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. लग्न ही आयुष्यातील एकमेव व अविस्मरणीय घटना असते. पन्नास नातेवाईकांना मंगल कार्यालयामार्फत मोफत मास्क, सॅनिटायझरही दिले जात आहेत, असे भगवान फुलसौंदर यांनी सांगितले.
कमी संख्या असल्याने कार्यालयांचे एकत्र पॅकेज केले आहे. कार्यालयाचे भाडेही पूर्वीपेक्षा २५ टक्केच (जेवण वगळून) आकारले जात आहे. पाच-पाच फुटाच्या अंतरावर नातेवाईकांना बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग होईल. मात्र अनेकांना लग्नकार्य थाटामाटात करायचे असते. ते सध्याच्या नियमात बसत नाही. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या तारखा नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच पुढे ढकलल्या आहेत. वºहाडी मंडळींना सर्व सोयी जागेवर पुरवल्या जात आहेत, जेणेकरून कार्यालयातील संख्या वाढणार नाही, याची दक्षता घेतो, असे धनंजय जाधव यांनी सांगितले.
पूर्वीपेक्षा कार्यालयाचे भाडे कमी करण्यात आलेले आहे. जेवणासह लग्नकार्य करून देण्याची व्यवस्था केली जाते. पन्नास जणांचा आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन व्हावे म्हणून वाजंत्री, बॅण्डपथक, सनई यांना आम्ही परवानगी देत नाहीत. याशिवाय कार्यालयील स्वच्छता यावर भर दिला जात आहे. गर्दी होणार नाही, यावरही आम्हाला नजर ठेवावी लागते. वर-वधू एकाच जिल्ह्यात आहेत, अशीच लग्नकार्य होत आहेत. वधू किंवा वरापैकी एकजण परजिल्ह्यात असल्याने इच्छा असूनही अनेकांना सध्या लग्न करता येत नाहीत. अशांनी दिवाळीनंतरच तारखा बुकिंग करण्यावर भर दिला आहे, असे कार्यालय चालक जयेश खरपुडे यांनी सांगितले.