श्रीगोंद्यातील लोकन्यायालयात पावणेतीन हजार दावे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:06+5:302021-09-26T04:24:06+5:30
श्रीगोंदा : येथील शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात विविध प्रकारच्या १२ हजार २३० दाव्यांपैकी २ हजार ७४१ दावे निकाली काढण्यात ...
श्रीगोंदा : येथील शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात विविध प्रकारच्या १२ हजार २३० दाव्यांपैकी २ हजार ७४१ दावे निकाली काढण्यात आले. त्यामुळे ७ कोटी ६३ लाख ९२ हजार ३५५ रुपयांची वसुली झाली.
मागील लोकन्यायालयात फैसला झालेल्या पक्षकारांना नुकसानभरपाई मंजूर केलेल्या धनादेशाचे वाटप करून कामकाजाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. एस. शेख, जिल्हा न्यायाधीश एन. जी. शुक्ला, दिवाणी न्यायाधीश एस. एस. शिंदे, सहदिवाणी न्यायाधीश एन. एस. काकडे, सहदिवाणी न्यायाधीश एस. जी. जाधव, सहदिवाणी न्यायाधीश निंबाळकर, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, वकील संघाचे अध्यक्ष सदाशिव कापसे, इतर अधिकारी, विधी तज्ज्ञांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.
न्यायाधीश एम. एस. शेख म्हणाले, वादी आणि प्रतिवादी यामध्ये दोघांना आनंदी ठेवून न्याय दिला जातो. त्यामुळे मानवी जीवन समाधानाने जगणे आणि एकमेकांविषयी आदराची भावना लोकन्यायालयातून होत आहे. मोटार अपघात, भू संपादन नुकसानभरपाई, महिलांचे पोटगी दावे, फौजदारी, दिवाणी दावे निकाली काढण्यात आले.
---
बाबा, पैसे दवाखान्यासाठी ठेवा
उद्घाटन कार्यक्रमात धनादेश वाटप चालू असताना वयाची सत्तरी गाठलेले एक ज्येष्ठ नागरिक धनादेश स्वीकारण्यासाठी पुढे आले. त्यावेळी न्यायाधीश एम. एस. शेख म्हणाले, बाबा, हा धनादेश तुमचे पैसे आहेत. तुमचे वय झाले आहे हे पैसे दवाखाना आणि औषधांसाठी जपून ठेवा.