पोट भरण्याची मारामार, मी टॅक्स कसा भरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:22 AM2021-09-23T04:22:56+5:302021-09-23T04:22:56+5:30
------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : प्रत्येकाला शासनाचा कोणता ना कोणता कर भरावा लागतोच. कोरोनाच्या महामारीमुळे व्यवसाय ठप्प झाले. ...
-------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : प्रत्येकाला शासनाचा कोणता ना कोणता कर भरावा लागतोच. कोरोनाच्या महामारीमुळे व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे पोट भरणे कठीण झाले असून, टॅक्स भरायचा कसा, असा प्रश्न व्यावसायिकांसमोर आहे.
कोरोनाच्या महामारीतही महापालिकेसह शासकीय कर भरणे बंधनकारक आहे. जन्माला आलेला प्रत्येक जण कुठला ना कुठला कर भरत असतो. व्यवसायात मिळत असलेल्या उत्पन्नावर सर्वांनाच कर भरावा लागतो. काहींना रोड टॅक्स, तर काहींना भाजीपाला विक्रीसाठी महापालिकेचे शुल्क नियमित भरावे लागते. व्यवसाय छोटा जरी असला तरी त्यावर कर हा भरावाच लागतो, याची जाणीव व्यावसायिकांना आहे. प्रत्येक जण कोणता ना कोणता कर भरून शासनाच्या तिजोरीत पैसा जमा करतो. कररूपाने जमा झालेल्या पैशातून शासनाकडून पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. कराच्या बदल्यात सुविधा मिळतात. म्हणून प्रत्येक जण कर भरत असल्याचे सांगण्यात आले.
....
ऑटो रिक्षा चालक- दरवर्षी रोड टॅक्स व वाहन आठ वर्षांहून जुने असेल तर पर्यावरण कर भरावा लागतो.
भाजी विक्रेते- रस्त्यावर भाजीपाला विकत असल्याने महापालिकेकडे रस्ता बाजू शुल्क नियमित भरावे लागते, तसेच या व्यवसायावर करही भरावा लागतो.
फेरीवाला- रस्त्यांच्या बाजूला बसून व्यवसाय करीत असल्याने महापालिकेला रस्ता बाजू शुल्क नियमित भरावे लागते.
सिक्युरिटी गार्ड- पगारातून कर जमा होतो, तसेच घरपट्टी व पाणीपट्टी हे कर भरावे लागतात.
सफाई कामगार- महापालिका हद्दीत राहत असल्याने घरपट्टी व पाणीपट्टी भरतो.
सलून चालक- महापालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी दरवर्षी भरावी लागते.
लाँड्री चालक- महापालिकेची घरपट्टी व पाणीपट्टीसह व्यवसाय कर भरावा लागतो.
घरकाम करणाऱ्या महिला- व्यवसायावर कर भरावा लागत नाही; पण महापालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी भरावी लागते.
....
- ज्यांचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे अशा सर्वसामान्य नागरिकांना अप्रत्यक्षरीत्या कर भरावा लागतो. पाच लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना प्रत्यक्ष कर भरावा लागतो. प्रत्येक जण कर भरतो म्हणजे आपल्या उत्पन्नाचा त्याग करतो. त्याबदल्यात त्यांना सुविधा म्हणजे लाभ मिळतो. जेवढा कर भरला जातो तेवढाच लाभ म्हणजे सुविधा मिळाल्या पाहिजे; परंतु तसे होत नाही. कराच्या तुलनेत सर्वसामान्यांना लाभ मिळत नाही.
- प्रा. माधव शिंदे, अर्थतज्ज्ञ