रामपूरच्या ग्रामसभेत दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:23 AM2021-03-01T04:23:07+5:302021-03-01T04:23:07+5:30
राहुरी : तालुक्यातील रामपूर येथे वाळूचा लिलावाबाबत झालेल्या ग्रामसभेत सत्ताधारी व विरोधी गटात मारामारी झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ग्रामसभा ...
राहुरी : तालुक्यातील रामपूर येथे वाळूचा लिलावाबाबत झालेल्या ग्रामसभेत सत्ताधारी व विरोधी गटात मारामारी झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ग्रामसभा स्थगित केली. ग्रामसभेचे नियोजन ठिकाण बदलल्याने अधिकाऱ्यांना ग्रामसभेच्या रोषाला सामोरे जावे लागले.
रामपूरच्या हद्दीतील मुळा नदी पात्रातील वाळूच्या लिलावासंदर्भात महसूल विभागाने शनिवारी (दि.२७) रोजी ग्रामसभा बोलावली होती. यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब साबळे, मंडळ अधिकारी तेजपाल शिंदे, सरपंच मीना मोरे, तलाठी एमडी रहाणे, ग्रामसेवक अधिकारी प्रतिभा भरसाकळ, पोलीसपाटील बाजीराव साबळे आदी उपस्थित होते.
मारुती मंदिरासमोर एका गटाची सभा सुरू होती. तेथे मंडळाधिकारी तेजपाल शिंदे यांनी वाळू लिलावाचा उद्देश सांगितला. मात्र, नितीन खळदकर, भास्कर नालकर, रावसाहेब पठारे, सुनील पठारे, दिलीप खळदकर व मच्छिंद्र मोरे आदींनी वाळू लिलावास विरोध दर्शविला. ग्रामसभेचे ठिकाण बदलण्याचे कारण रावसाहेब साबळे यांनी विचारले. वाळू उपशामुळे शेतकऱ्यांचे व बंधाऱ्याचे नुकसान झाले, असे सांगत विरोधकांनी वाळूचा लिलाव तीव्र विरोध केला. त्यातून काही जणांमध्ये बाचाबाची झाली. त्यांचे पर्यावसन मारामारीत झाले. यामुळे रामपूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
....
ज्येष्ठ नेते रावसाहेब साबळे कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी ग्रामसभेत मारामारीचा प्रकार घडून आणला. आमच्या गटाच्या बाजूंनी वाळू लिलाव बहुमताने मंजूर होऊ नये म्हणून विरोधकांनी धुमाकूळ घातला. आम्ही पुन्हा ग्रामसभा घेऊन लिलावाला मंजुरी घेणार आहोत.
-रावसाहेब साबळे,
माजी अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक
....
रावसाहेब साबळे व त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी लिलाव होकार दिलेला दिसतो. मात्र, वाळू उपशामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होते. त्यामुळे अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी येत असल्याने हा लिलाव होऊ नये यासाठी आम्ही विरोध केला.
- नंदू खळदकर,
ग्रामस्थ, रामपूर