कर्जत-जामखेडमध्ये भाजप-राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 01:09 PM2019-10-18T13:09:58+5:302019-10-18T13:10:19+5:30

कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून मागील २५ वर्षांपासून भाजपचे एकतर्फी वर्चस्व आहे. प्रथमच या निवडणुकीत पवार घराण्याने उमेदवारी करून भाजपापुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक रंगतदार बनली आहे. राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार व राधाकृष्ण विखे यांच्यासोबतच राष्ट्रवादी व भाजपनेही या मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Fighting for reputation for BJP-NCP in Karjat-Jamkhed | कर्जत-जामखेडमध्ये भाजप-राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढत

कर्जत-जामखेडमध्ये भाजप-राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढत

निवडणूक वार्तापत्र - अशोक निमोणकर /  
कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून मागील २५ वर्षांपासून भाजपचे एकतर्फी वर्चस्व आहे. प्रथमच या निवडणुकीत पवार घराण्याने उमेदवारी करून भाजपापुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक रंगतदार बनली आहे. राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार व राधाकृष्ण विखे यांच्यासोबतच राष्ट्रवादी व भाजपनेही या मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेले पालकमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू व युवा नेते रोहित पवार समोरासमोर लढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेनिमित्त सभा घेऊन शिंदे यांना पुन्हा मंत्री करण्याची घोषणा केली.  सिध्दटेक येथे शिंदे यांच्या प्रचाराचा नारळही मुख्यमंत्र्यांनीच वाढविला. पंकजा मुंडे, माजी मंत्री सुरेश धस व स्वत: सभा घेऊन शिंदे यांनी विकास कामांची माहिती देत मतदारसंघ पिंजून काढला. अमित शहा हे सांगता सभा  घेणार आहेत. आगामी कालावधीत बाहेरील राज्यातील लोक मतदारसंघात विकासाचे कामे पहायला येतील असे ते सांगत आहेत. परका उमेदवार व हक्काचा उमेदवार हा मुद्दा मतदारसंघात चर्चेचा ठरला आहे. 
रोहित पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. अमोल कोल्हे, धनंजय मुंडे यांनी प्रचार सभा घेऊन भाजप सेनेवर टीका करून वातावरण तापवले आहे. रोहित पवार हे युवक व महिला मेळावा, आरोग्य शिबिर, पाणी वाटप या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले आहेत.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून रान पेटवले आहे. सुरवातीला रोहित पवार यांनी जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्री मोरे व त्यांचे पती भाजप जिल्हाउपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवून आणला. मागासवर्गीय समाजाचे विकी सदाफुले यांना सोबत घेऊन त्यांनी मतदारसंघात पकड निर्माण केली. त्यानंतर सावध झालेले पालकमंत्री शिंदे यांनी मोर्चेबांधणी करून उपसभापती व त्यांचे पती वगळता इतर सर्वांना पक्षात आणले. भाजप, शिवसेना, रिपाइं व रासप या पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्त्यांना त्यांनी प्रचारात उतरविले. त्यांच्यासह पवार घरोघरी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. 
रोहित पवार व राम शिंदे यांनी सोशल मीडियावर भर दिला आहे. एकमेकांचे कार्टून टाकून ट्रोल केले जात आहेत. सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना मोठी किंमत आली आहे. सध्या रब्बी हंगाम चालू असल्याने शेतकरी पेरण्यात गुंतला आहे. खरीप पिकाची सोंगणी चालू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सभा घेणे दोन्ही उमेदवारांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. अंतिम टप्प्यात आलेली निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अरुण जाधव यांनी वंचित घटकांची मोट बांधली आहे. जाधव हे कोणाची डोकेदुखी ठरणार याकडे लक्ष लागले आहे. 
प्रचारातील प्रमुख मुद्दे 
मंत्रिपद मिळाल्यानंतर मतदारसंघात ७० वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढला आहे. शासकीय कृषी महाविद्यालय, तालुक्यातील प्रत्येक गावात रस्ता व पाणीपुरवठा योजना, जामखेड शहरासाठी उजनीचे पाणी, कर्जत पाणीपुरवठा योजना, अद्ययावत स्मशानभूमी, कुकडी कामासाठी योजना, तुकाई चारी, ४०० केव्हीचा ऊर्जा प्रकल्प, सर्वच मंदिराचा पर्यटन स्थळात समावेश हे मुद्दे राम शिंदे प्रचारात मांडत आहेत. मी सालकºयाचा मुलगा आहे तर ते धनाड्य व बाहेरचे आहेत अशीही टीका ते करतात. 
तालुक्याला दुष्काळात खाजगी टँकरने पाणीपुरवठा आपण केला. सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे घेतली. या मतदारसंघाचा विकास खोळंबला असून  भविष्यात बारामतीसारखा विकास करण्याची ग्वाही रोहित पवार देत आहेत. बाहेरचा उमेदवार या मुद्द्याबाबत स्पष्टीकरण देऊन त्यांच्यावरील आरोप खोडत आहेत.

Web Title: Fighting for reputation for BJP-NCP in Karjat-Jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.